शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav
शेवगाव पोलीस ठाण्याअंतर्गत कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचार्याची छेडछाड करणार्या पोलिसाविरुद्ध पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने अखेर मंगळवारी (दि.10) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील रत्नपारखी असे गुन्हा दाखल झालेल्या पोलिसाचे नाव आहे.
शेवगाव येथील पोलीस ठाण्यात नेमणुकीस असणार्या या पोलिसाने येथे कार्यरत असणार्या सहकारी महिला पोलिसाची छेडछाड केल्याचा प्रकार 14 सप्टेंबर रोजी दुपारी पोलीस ठाण्यातच घडला होता. यावरून महिला पोलिसाने याचा जाब विचारत पोलीस निरीक्षकांकडे तक्रार केली होती. तसेच पोलीस ठाण्यातच यावरून बरेच वादंग झाले होते. सदर पीडित महिला पोलिसाने तक्रार अर्ज दाखल केला होता. तसेच दुसर्या दिवशी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची समक्ष भेट घेऊन तक्रार केली होती.
मात्र, या घटनेबाबत गुप्तता पाळण्यात आली. सदर घटनेची खात्यांतर्गत विशाखा समितीमार्फत चौकशी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिले होते. त्यानंतर विशाखा समितीच्या अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी चौकशी करून अहवाल सादर केला होता. सादर झालेल्या अहवालावरून पोलीस अधीक्षक ओला यांनी या पोलिसावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मंगळवारी (दि. 10) सुनील रत्नपारखी या पोलिसाविरुद्ध छेडछाडीचा गुन्हा शेवगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.