पाथर्डी । तालुका प्रतिनिधी
एसटी प्रवासादरम्यान एका महिला प्रवाशाच्या पर्समधून अठरा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व पंधरा हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली आहे. याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भीमराव माणिकराव ढाकणे (रा. मिरकळा, ता. गेवराई, जि. बीड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १६ मार्च रोजी सकाळी साडे आठ वाजता ते व त्यांची पत्नी पुष्पा ढाकणे हे गेवराई बसस्थानकावरून परभणी ते वल्लभनगर पुणे ही एसटी बस पकडून अहिल्यानगरकडे प्रवास करत होते.
प्रवासादरम्यान पुष्पा ढाकणे यांनी गळ्यातील सोन्याची पोत व अंगठी काढून पर्समध्ये ठेवली होती. पाथर्डी ते तिसगाव मार्गावर प्रवास करत असताना त्यांच्या पर्समध्ये पाच ग्रॅमचे सोन्याचे पेंडल, नऊ ग्रॅमची पोत, चार ग्रॅमची अंगठी आणि पंधरा हजार रुपयांची रोकड होती.
बस करंजी बस स्थानकावर पोहोचल्यावर पती-पत्नीने पर्स तपासली असता, पर्समधील दागिने आणि रोख रक्कम गायब असल्याचे लक्षात आले. चोरट्याने एकूण अठरा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि पंधरा हजार रुपयांची रोकड लंपास केली.
या प्रकरणी भीमराव ढाकणे यांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, चोरी घडलेल्या एसटी बसमध्ये तपासणी करण्यात येत आहे.
गेल्या काही काळात एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याचे प्रकार वाढले आहेत. विशेषतः महिलांच्या पर्स, दागिने व रोकड यावर चोरट्यांचे लक्ष असते. गर्दीचा फायदा घेत महिलांची टोळी किंवा कुशल चोरटे या प्रकारचे गुन्हे करत असल्याचे उघड झाले आहे.
एसटी बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लक्ष्य करणारी महिलांची मोठी टोळी कार्यरत आहे. बसमध्ये गर्दी असताना या टोळ्या प्रवाशांच्या पर्समधील मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारत आहेत. चोरी केल्यानंतर ते पटकन गर्दीत मिसळून निघून जातात, त्यामुळे त्यांचा माग काढणे कठीण होते.