शिरूर (तालुका प्रतिनिधी)
यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यात राहणाऱ्या ४० वर्षीय सुलोचना दुधाराम राठोड यांच्याकडील सव्वा तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लुटले. या दागिन्यांची किंमत ९१ हजार रुपये आहे. दोन अनोळखी व्यक्तींविरोधात त्यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली.
ही घटना ३ एप्रिल २०२५ रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास घडली. पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील शिरुरजवळील बो-हाडे मळा येथे कल्याणी हॉटेलसमोर ही लूट झाली. सुलोचना यांचा चुलत भाऊ गाडीत झोपला असताना हे प्रकार घडले.
सुलोचना यांच्या चारचाकी गाडीचा (क्र. MH 37 AD 8907) दरवाजा दोन अनोळखी व्यक्तींनी उघडायला लावला. त्यापैकी एकाने चाकू दाखवून त्यांच्या गळ्यातील मणी मंगळसूत्र आणि कंठण हिसकावले. भीतीपोटी सुलोचनांनी कानातील सोन्याच्या रिंगाही चोरट्यांना दिल्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुलोचना मजुरी करतात आणि उत्तरवाडोना (ता. नेर, जि. यवतमाळ) येथे राहतात. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करून तपास सुरू केला आहे.