अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
एका शिक्षिकेच्या घरी त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या नातेवाईकांनी घरफोडी करून संसारोपयोगी साहित्यासह 20 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. सदरची घटना 14 एप्रिल रोजी सायंकाळी घडली असून 16 एप्रिल रोजी सायंकाळी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मंदाकिनी सदाशिव लाटे (वय 52, हल्ली रा. वडाळी, ता. श्रीगोंदा) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी वडाळी येथे नोकरीस असून त्या आठवड्याच्या सुट्ट्यांमध्ये अहिल्यानगर शहरातील गुलमोहर रौनक अपार्टमेंट, प्लॉट नं. 10 येथे वास्तव्यास येतात.
सदर फ्लॅट त्यांच्या नावावर असून त्यांनी तो 2008 साली खरेदी केला आहे. 15 एप्रिल रोजी त्यांचा मुलगा प्रतिक औटी फ्लॅटवर गेला असता, फ्लॅटचे कुलूप तोडलेले असून घरातील सामान चोरीस गेले आहे, असे त्याच्या लक्ष्यात आले व त्याने फिर्यादीला माहिती दिली. त्यांनी तातडीने फ्लॅटवर धाव घेतली असता त्यांना घरातील वस्तू दिसून आल्या नाही. स्थानिकांकडून माहिती घेतली असता 14 एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मंदाकिनी यांचे नातेवाईक सोपान रामनाथ कासार (रा. ऐश्वर्या बंगला, तिडके कॉलनी, बाजीरावनगर, नाशिक) हे टेम्पोसह काही तरुणांसोबत आले होते.
त्यांनीच फ्लॅटचे कुलूप तोडून घरातील वस्तू उचलून नेल्याचे वॉचमनने सांगितले. घरातील वस्तूमध्ये सोफा, वॉल फॅन, गिझर, इन्व्हर्टर, घरगुती भांडी व इतर वस्तूंचा समावेश आहे. यासंदर्भात मंदाकिनी लाटे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सोपान रामनाथ कासार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.