राहाता |वार्ताहर| Rahata
राहाता शहरात अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणामुळे (Minor Girl Molestation) संतापाची लाट उसळली असताना पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी कठोर कारवाईची भूमिका घेतलेल्या भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील (Dr. Sujay Vikhe Patil) यांनी दिलेला शब्द अखेर पूर्ण झाला आहे. प्रशासनाने संबंधित आरोपीच्या (Accused) अनधिकृत बांधकामावर बुलडोझर चालवत कारवाई केली.
विनयभंगाची घटना घडल्यानंतर डॉ. सुजय विखे पाटील (Dr. Sujay Vikhe Patil) यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेत त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच महिलांच्या सन्मानाशी खेळ करणार्यांविरोधात कोणतीही दया दाखवली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला होता त्यावेळी त्यांनी राहाता (Rahata) शहरात सर्वे नंबर 340 व गोदावरी वसाहत या ठिकाणी रहिवासी असलेले तरुणांविरोधात वेगवेगळे प्रकारचे गुन्हे दाखल असलेल्या तक्रारी आपल्याकडे आल्या असून महिला भगिनींची सुरक्षेची जबाबदारी लोकप्रतिनिधी या नात्याने विखे पाटील कुटुंबाची आहे. यापुढे महिलांची छेड कोणी काढल्यास त्याच्या घरावर तात्काळ बुलडोझर फिरवण्यात येईल, असा इशारा डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिला होता.
डॉ. सुजय विखे यांनी महिलांची छेड (Woman Teasing) काढणार्या विरोधात केलेले ते वक्तव्य सत्यात उतरणार का याबाबत नागरिकांमध्ये चर्चा होती. अखेर गुरुवारी पोलीस, महसूल आणि नगरपालिका प्रशासनाने संयुक्त कारवाई करत आरोपीच्या घरावर (House Bulldozer) बुलडोझर चालवला. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. यापुढे असे कृत्य करणार्या गुन्हेगारांनी आजच्या कारवाईची धास्ती घेतली आहे. या कारवाईमुळे राहाता शहरासह संपूर्ण तालुक्यात कायद्याचा धाक निर्माण झाला असून महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासन गंभीर असल्याचा संदेश गेला आहे.
गुन्हेगार कोणताही असो, त्याला कायद्यापुढे झुकावेच लागेल, ही भूमिका या कारवाईतून अधोरेखित झाली आहे. डॉ. सुजय विखे पाटील यांनी याप्रसंगी प्रतिक्रिया देताना सांगितले की, पीडितेला न्याय मिळवून देणे आणि समाजात सुरक्षित वातावरण निर्माण करणे ही आपली जबाबदारी आहे. महिलांवर अत्याचार करणार्यांना कोणतीही माफी नाही. कायद्याच्या चौकटीत राहून अशा प्रवृत्तींवर कठोर कारवाई व्हायलाच हवी. दरम्यान, या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून पीडित कुटुंबीयांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.




