Tuesday, March 25, 2025
Homeनगरमहिला बचत गट आता उतरणार स्थानिक बाजारपेठेत

महिला बचत गट आता उतरणार स्थानिक बाजारपेठेत

यात्रा-जत्रांसह मोठे आठवडे बाजार असणार्‍या गावांत करणार उलाढाल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

महिला बचत चळवळीची मोठी परंपरा असणार्‍या नगर जिल्ह्यातील महिला बचत गटांनी आता स्थानिक बाजारपेठेत आपला दबदबा निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषद आणि जिल्हा उमेद अभियान यांच्या माध्यमातून जिल्ह्यात तयार झालेल्या 27 हजार 324 महिला बचत गटातून प्रत्येक तालुक्यातील निवडक गट आता गावातील स्थानिक आठवडे बाजार यासह या पुढील काळात भरणार्‍या यात्रा, जत्रा उत्सवात उत्पादित केलेल्या साहित्याचे दुकान थाटत यातून स्थानिक बाजारपेठेवर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न करणार आहेत. यादृष्टीने प्रयत्न सुरू करण्यात आले असून गेल्या काही महिन्यांपासून हा प्रयोग यशस्वी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर आता पूर्ण ताकदीने महिला बचत गट स्थानिक आठवडे बाजार यात्रा, उत्सव जत्रा उत्सवात उलाढालीसाठी सज्ज झाले आहेत.

- Advertisement -

सरकारने ग्रामीण भागातील महिलांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी, तसेच लहान मोठ्या व्यवसायातून महिलांना आर्थिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महिला बचत गट चळवळ सुरू केली. ही चळवळ नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढली असून गेल्या पंधरा वर्षात नगर जिल्ह्यात उमेद अंतर्गत झालेल्या महिला बचत गट विक्री प्रदर्शनात मोठी यश आल्याचे दिसून आलेले आहे. जिल्ह्यातील अनेक बचत गटांनी नगरसह मुंबईच्या सरसच्या मैदानावर आपली छाप पाडल्याचे दिसून आलेले आहेत. नगरच्या बचत गटांनी तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थ, साहित्य यांना राज्य पातळीवर मागणी असल्याचे गेल्या काही वर्षाचा अनुभव आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील अनेक महिला बचत गटाची स्वतंत्र ओळख असून त्यांनी उत्पादित केलेल्या साहित्य, खाद्यपदार्थ आणि अन्य वस्तू यांना मोठी मागणी असल्याचे दिसून आलेले आहेत. जामखेडमधील एका महिला बचत गटाने उत्पादित केलेले पोलपट लाटणे राज्यातील अनेक बड्या प्रशासकीय अधिकार्‍यांसह राजकीय व्यक्तींच्या स्वयंपाक घरात स्थान मिळवलेले आहे.

बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाचा प्रचार प्रसार वाढावा, तसेच यातून महिलांना वर्षभर उत्पन्न मिळावे, या दृष्टिकोनातून जिल्हा परिषदेच्या उमेद विभागाने काही महिन्यापूर्वी नाविन्यपूर्ण संकल्पना म्हणून पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील मोठ्या यात्रांच्या ठिकाणी काही स्थानिक महिला बचत गटांचे स्टॉल लावण्याचा निर्णय घेतला आहे. यात अनेक महिला बचत गटांना उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून आता जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात होणार्‍या मोठ्या यात्रा जत्रा तसेच प्रमुख गावातील आठवडे बाजारात स्थानिक महिला बचत गट प्रतिनिधींच्या उत्पादनाची स्टॉल लावण्यात येणार आहेत. या ठिकाणी या बचत गटांना नवीन बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा जिल्हा परिषदेचा प्रयत्न आहे.

यासाठी जिल्हा परिषदेचे उमेदवार बचत गटांना स्टॉल लावण्यासाठी टेन्ट (मंडप साहित्य) यासह मोक्याच्या ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. हा प्रयोग पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवी या तीर्थक्षेत्रासह महाशिवरात्रीच्या वेळी नगर तालुक्यातील डोंगरगण येथे राबविण्यात आलेला आहे. नगर जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात वर्षभर 25 ते 30 महिला बचत गट सक्रिय असून विविध साहित्य यासह खाद्यपदार्थाची निर्मिती करत असतात. या बचत गटांना स्थानिक बाजारपेठेत ग्राहक उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रयोग करण्यात येत आहे.

अहिल्यानगरला होणार बचत गटांचा मॉल
नगर जिल्ह्यात महिला बचत गट सक्षम झालेले असून त्यांनी तयार केलेल्या साहित्याला हक्काची बाजारपेठ मिळावी, यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी बचत गटांचा मॉल ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. सध्या या मॉलची प्रक्रिया प्रशासकीय पातळीवर मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असून यासाठी राज्य सरकारकडून 5 हजार स्क्वेअर फूट जागा उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर महिला बचत गटांच्या मॉलची संकल्पना प्रत्यक्षात उतरणार आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...