पुणे | Pune
काही दिवसांपूर्वी पोलिसांनी पुण्यात सुरू असलेल्या एका रेव्ह पार्टीवर छापा टाकला होता. या प्रकरणात माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पोलिसांनी अटक केली आहे, ते सध्या जेलमध्ये आहेत. पुण्यात रेव्ह पार्टीवर छापा टाकून पोलिसांनी केलेल्या कारवाई दरम्यान महिलांचा अश्लिल आणि अनैतिक वापर झाल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. तसेच आरोपी प्रांजल खेवलकर यांनी याआधीही वेगवेगळ्या ठिकाणी हॉटेल बुक करून एजंटमार्फत महिलांना आणल्याचे दिसत आहे. आता याच प्रकरणी मोठी अपडेट समोर आली असून महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पुणे पोलिस महासंचालकांना पत्र पाठवले आहे.
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांकडून पोलीस महासंचालकांना पत्र पाठवण्यात आले आहे. हा मानवी तस्करीचा प्रकार असल्याचा आरोप करत संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी, महिला आयोगाकडून पोलीस महासंचालकांकडे करण्यात आली आहे.
मानवी तस्करीचा प्रकार
मानवी तस्करीच्या अनुषंगाने खराडी प्रकरणाची विशेष तपास पथकाकडून चौकशी व्हावी, असे पत्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पोलिस महासंचालक यांना दिले आहेत. प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये अश्लिल व्हिडीओ आणि फोटो आढळले होते. त्यामुळे हे सगळे मानवी तस्करीचा प्रकार असल्याचे रुपाली चाकणकर यांनी म्हटले होते. आता याच प्रकरणी त्यांनी थेट पोलीस महासंचालकाला पत्र देत सखोल चौकशी करुन महिलांचे मूळ गाव, वय, वैद्यकीय अहवाल आणि ओळख दस्तऐवजांची खातरजमा व्हायला हवी असे या पत्रात नमुद केले आहे.
एसआयटी स्थापन करुन सखोल चौकशी करून कारवाई करावी
तसेच, पोलिसांच्या मानवी तस्करी प्रतिबंध पथकाकडून (AHTU)महिलांना कशा प्रकारे आणले गेले, फसवणूक, दबाव टाकून या महिलांना पार्टीसाठी बोलवण्यात आलेय का?, याच्या चौकशीची मागणीदेखील पत्राद्वारे केली आहे. त्यासोबतच महिला अधिकाऱ्याचा समावेश आलेली एसआयटी स्थापन करून गोपनीयता बाळगून सखोल चौकशी करुन योग्य कारवाई करण्याच यावी, असे महिला आयोगाने पोलिसांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. या पत्रामुळे प्रांजल खेवलकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





