नाशिक । प्रतिनिधी Nashik
राज्य शासनाच्या मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत शुक्रवारी (दि.23) मुख्यमंत्री व दोनही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महिलांचे महाशिबिर घेण्यात येणार आहे. या महाशिबिराच्या संदर्भात यंत्रणांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे व समन्वयाने काटेकोरपणे यशस्वी नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आज अधिकार्यांना दिल्या.
शासनाच्या योजनांची लाभार्थींना थेट मदत, लाभ तसेच विविध शासकीय योजनांच्या माहितीचा प्रसार होण्यासाठी या महाशिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. या महाशिबिराच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीस प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, नाशिक महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, मनपाचे शहर अभियंता संजय अग्रवाल यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
तपोवनातील सिटी बस लिंक डेपो शेजारील मैदानावर आयोजित या महाशिबिरास सुमारे 50 हजार महिला उपस्थित राहण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या महाशिबिराच्या आयोजनात जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, महानगरपालिका, पोलीस, वाहतूक, महिला व बालविकास अशा संबंधित सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून नियोजन व कार्यवाही करण्याची सूचना जिल्हाधिकार्यांनी काल बैठकीत दिली. यावेळी उपस्थित लाभार्थींना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देणारे स्टॉल्स उभारावेत. तसेच, इच्छुक लाभार्थींची नोंदणी करण्यासाठी एक स्वतंत्र स्टॉल उभारण्यात यावा, असेही त्यांनी यावेळी सूचित केले.
यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी मान्यवरांची बैठक व्यवस्था, अखंडित वीज पुरवठा, जनरेटर्स, महाशिबिरास येणार्या महिला व अन्य लाभार्थींची वाहत्ाूक व्यवस्था, कार्यक्रम स्थळाची स्वच्छता, स्वच्छ पेयजल, पार्किंग व्यवस्था, मोबाईल स्वच्छता गृहे, वैद्यकीय व्यवस्था, प्रथमोपचार, रूग्णवाहिका, अग्निशामक वाहने, सूत्र्ा संचालन, सांस्कृतिक कार्यक्रम, एलईडी स्क्रीन्स आदींबाबत सविस्तर आढावा घेतला.