अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
सरकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचार्यांशी चांगली ओळख आहे, त्या ओळखीने सरकारी कार्यालयातील कामे करून देतो असे सांगत शहरातील रेल्वेस्टेशन परिसरातील अनेक महिलांकडून एकाने पैसे घेत त्यांची कामे न करता फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी महादेव किसन डाडर (रा. पाटेवाडी, ता. कर्जत) या व्यक्तीवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शोभा संजय शिंदे (रा. बोहरी चाळ, रेल्वेस्टेशन) यांनी फिर्याद दिली आहे. डाडर हा एप्रिल 2024 मध्ये फिर्यादीच्या वडिलांच्या मित्रासोबत एक दिवस त्यांच्या घरी आला होता. त्यावेळी बोलताना त्याने आपली जिल्हाधिकारी, तहसील कार्यालय तसेच इतर सरकारी कार्यालयांतील अधिकारी, कर्मचार्यांशी चांगली ओळख आहे. तुमचे काही काम असेल तर सांगा, मी ते करून देतो असे म्हणाला होता. त्यावेळी फिर्यादीने त्याला सासर्यांच्या सातबारा उतार्यावर नाव लावायचे आहे, असे सांगितले असता त्याने 30 हजार रुपये खर्च येईल असे सांगितले.
त्यानंतर काही दिवसांनी डाडर याने विरंगुळा मैदान येथे ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात फिर्यादीचा भाऊ संघराज भोसले यास बोलावून घेतले व त्याच्याकडून या कामासाठी 15 हजार रुपये रोख घेतले. काम झाल्याचे सांगून पुन्हा फिर्यादीकडून 15 हजार रोख स्वरूपात घेतले. काम न झाल्याने फिर्यादीने त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याने फिर्यादी कोतवाली पोलीस ठाण्यात गेल्या असता डाडरने रेल्वेस्टेशन, आगरकर मळा परिसरातील इतर 14 महिलांची रेशन कार्ड काढणे, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजनेतून पेन्शन चालू करून देतो. शिलाई मशीन मिळवून देतो, वयोश्री योजनेतून साहित्य मिळवून देतो असे म्हणून फसवणूक केली आहे. त्याने त्यांच्याकडून एक हजार, तीन ते चार हजारांपर्यंत रक्कम जमा केली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.