Monday, May 27, 2024
Homeनगरदोन बुरखाधारी महिलेकडून ज्वेलर्समध्ये हातसफाई

दोन बुरखाधारी महिलेकडून ज्वेलर्समध्ये हातसफाई

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरातील भाग्यलक्ष्मी लॉन्स जवळील कल्याण ज्वेलर्स या दुकानातून दोन बुरखाधारी महिलेने दोन लाख रुपये किमतीचे सुमारे चार तोळ्याचे नेकलेस त्यामध्ये एक लाख रुपये किमतीचे हिर्‍याचे दागिने असा तीन लाख रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला आहे. सोमवारी (दि. 6) रात्री सव्वा आठच्या सुमारास ही घटना घडली.

- Advertisement -

याप्रकरणी सेल्समन पुजा शाम जगताप (वय 33 रा. मोर्या कॉलनी, नगर) यांनी मंगळवारी (दि. 7) रात्री 10 वाजता तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोन अनोळखी बुरखाधारी महिलांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली असून तोफखाना पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आहे.

सोमवारी सकाळी सव्वा दहा ते रात्री सव्वा आठच्या दरम्यान सेल्समन जगताप यांची कल्याण ज्वेलर्स या दुकानात ड्युटी सुरू होती. रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास दोन बुरखाधारी महिला या दागिने पाहण्यासाठी आलेल्या होत्या. त्यांनी सोने खरेदी करायचे आहे असे सांगून नेकलेसची माागणी केली. यावेळी सेल्समन पूजा जगताप या त्यांना दागिने दाखवत होत्या. त्यावेळी इतर कामगारही दुकानात हजर होते. जगताप यांची नजर चुकवून त्या दोन महिलांनी तीन लाख रुपये किमतीचे दागिने चोरून पोबारा केला. कामगारांनी रात्रीच्या वेळी दुकानातील दागिन्यांची मोजणी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर तोफखाना पोलिसांना माहिती देत गुन्हा दाखल करण्यात आला.

दिवाळी खरेदीच्या गर्दीचा फायदा

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ज्वेलर्स, कपडे आणि इतर दुकानांमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी आहे. त्यातच अशा प्रकारचे चोरीचे प्रकार सुरू झाले आहेत. गर्दीचा फायदा घेऊन चोरीच्या घटना वाढत असल्याने व्यापार्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. दरम्यान तब्बल तीन लाख रुपये किमतीचे दागिने चोरीला गेल्याने सराफ बाजारात खळबळ उडाली आहे. पोलिसांची बाजारपेठेतील गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या