Wednesday, June 17, 2026
Homeब्रेकिंग न्यूजअवैध दारू विक्री विरोधात शिर्डी-सुरत महामार्गावर महिलांचे आंदोलन

अवैध दारू विक्री विरोधात शिर्डी-सुरत महामार्गावर महिलांचे आंदोलन

ओझे l वार्ताहर Oze

- Advertisement -

वणी परिसरातील वाढत्या अवैध दारू विक्रीमुळे त्रस्त झालेल्या महिलांच्या संयमाचा अखेर बांध फुटला असून,माळे फाटा येथे शेकडो महिला रस्त्यावर उतरल्या.अनेक वेळा पोलीस प्रशासनाकडे तक्रारी करूनही कुठलीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत संतप्त महिलांनी शिर्डी-सुरत राष्ट्रीय महामार्ग रोखून आपला रोष व्यक्त केला.या आंदोलनामुळे महामार्गावर अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.

परिसरात खुलेआम सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत असून,घरातील कर्ते पुरुष व युवक व्यसनांच्या आहारी जात असल्याने महिलांमध्ये तीव्र नाराजी आहे. “दारू विक्री बंद करा,आमचा संसार वाचवा,आमची घरे वाचवा” अशा घोषणा देत महिलांनी प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार,अवैध व्यवसायांबाबत वारंवार तक्रारी करूनही पोलीस यंत्रणा अपेक्षित ती दखल घेत नसल्याने महिलांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आली.त्यामुळे वणी परिसरातील पोलीस गस्त, कायदा-सुव्यवस्था आणि अवैध धंद्यांवर नियंत्रण या मुद्द्यांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

महिलांच्या आक्रमक भूमिकेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि आंदोलक महिलांशी चर्चा करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान,”तक्रारींकडे दुर्लक्ष होत असेल तर सामान्य नागरिकांनी न्याय मागायचा कुणाकडे ?” असा संतप्त सवाल महिला वर्गातून उपस्थित केला जात असून,अवैध दारू विक्रीच्या विरोधात उभ्या राहिलेल्या या आंदोलनाने संपूर्ण वणी परिसरात खळबळ उडवून दिली आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेचा भाग म्हणून सभासद संस्थांच्या (सेवा सोसायट्यांच्या) प्रतिनिधींचे ठराव 17...