Wednesday, October 21, 2026
HomeनगरShrirampur : महिलांच्या सुरक्षेसाठी श्रीरामपूर पोलिसांचा अनोखा उपक्रम

Shrirampur : महिलांच्या सुरक्षेसाठी श्रीरामपूर पोलिसांचा अनोखा उपक्रम

नवरात्रीत महिलांच्या सुरक्षेचा थेट आढावा || 93 टक्के महिलांनी मानले पोलिसांचे आभार

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

स्त्रीशक्तीचा जागर करणार्‍या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्यावतीने महिला व मुलींच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी एक अत्यंत संवेदनशील आणि अनोखा उपक्रम राबविण्यात आला. गेल्या दोन वर्षांत छेडछाड, विनयभंग आणि बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांची तक्रार दिलेल्या सुमारे एक हजार महिलांशी थेट संपर्क साधून त्यांच्या सुरक्षिततेचा आणि कारवाईचा वस्तुनिष्ठ आढावा पोलिसांकडून घेण्यात आला.
श्रीरामपूर विभागांतर्गत येणार्‍या एकूण 17 पोलीस ठाण्यांच्या (संगमनेर शहर, संगमनेर तालुका, अकोले, राजूर, घारगाव, आश्वी, कोपरगाव शहर, कोपरगाव तालुका, शिर्डी, लोणी, राहता, श्रीरामपूर शहर, श्रीरामपूर तालुका, राहुरी, नेवासा, सोनई व शनिशिंगणापूर) हद्दीत सन 2025 आणि 2026 या दोन वर्षांत दाखल झालेल्या गुन्ह्यांची आकडेवारी गोळा करण्यात आली.

- Advertisement -

यामध्ये बलात्काराचे 251 आणि विनयभंगाचे 666 असे एकूण 917 गुन्हे नोंदवले गेले होते. या सर्व प्रकरणांमध्ये झालेल्या कारवाईचा आढावा घेण्यासाठी महिला पोलीस उपनिरीक्षकांसह महिला अंमलदारांची एक विशेष टीम तयार करण्यात आली. नवरात्रोत्सवाच्या सुरुवातीपासून या पथकाने मागील दोन वर्षांत तक्रार दिलेल्या प्रत्येक महिला व मुलीच्या मोबाईल क्रमांकावर थेट संपर्क साधला. यामध्ये महिला पोलीस अधिकार्‍यांनी सदर गुन्ह्याचे निराकरण योग्य पद्धतीने झाले का?, आरोपीकडून सध्या कोणताही त्रास, पाठलाग किंवा गैरप्रकार सुरू आहे का? या सर्व बाबींची सखोल चौकशी करण्यात आली. गेल्या तीन दिवसांत सुमारे एक हजार महिला व मुलींशी संपर्क साधून याबाबत सखोल विचारना करण्यात आली.

93 टक्के महिलांनी व्यक्त केले समाधान: या मोहिमेदरम्यान 846 मुली व महिलांनी पोलिसांच्या कारवाईवर पूर्ण समाधान व्यक्त केले. पोलिसांनी आरोपींचा योग्य तो बंदोबस्त केल्यामुळे सध्या आपल्याला कोणताही त्रास नसल्याची सकारात्मक प्रतिक्रिया त्यांनी दिली. मात्र, दुसरीकडे 71 महिलांनी आजही संबंधित आरोपींकडून त्रास होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले. या गंभीर बाबीची दखल घेत पोलीस प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत. सदर उपक्रम अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी महिला पोलीस उपनिरीक्षक शीतल मुगडे, म.पो.स.ई. बेबी शिंदे, म.पो.हे.कॉ. सविता उंदरे, म.पो.कॉ. पुनम मन्तोडे, म.पो.कॉ. रुपाली लोहाळे (नेमणूक श्रीरामपूर शहर पो.स्टे.), तसेच आर.सी.पी. श्रीरामपूर येथील म.पो.कॉ. शिवानी देशमुख, म.पो.कॉ. निशिगंधा कोळसे, म.पो.कॉ. वैष्णवी दहिटनेकर, म.पो.कॉ. तेजल अभंग आणि म.पो.कॉ. अर्चना अहिरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

पोलिसांचा कठोर इशारा आणि पुढील पावले
ज्या 7 टक्के महिलांना अद्यापही त्रास सुरू असल्याचे निष्पन्न झाले आहे, त्याबाबत अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाने स्पष्ट केले आहे की, अशा सर्व आरोपींवर येत्या 7 ते 10 दिवसांत गंभीर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल. तसेच, संबंधित महिला तक्रारदार नव्याने गुन्हा दाखल करण्यास तयार असल्यास त्वरित नवीन गुन्हा देखील नोंदवला जाणार आहे.

अपर पोलीस अधिक्षक कार्यालयाचे कौतुक
ऐन नवरात्रीच्या काळातच महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने राबविलेल्या या व्यापक उपक्रमाचे अनेक महिलांसह नागरिकांनी कौतुक केले आहे. यापुढेही अशाच प्रकारचे उपक्रम पोलीस प्रशासनाकडून राबविले गेले तर समाजातील गुन्हेगार असे कृत्यच करणार नाही, अशा प्रतिक्रिया समाजात उमटल्या आहेत.

ताज्या बातम्या

पडसाद : धर्म, अहंकार आणि सिंहस्थ

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक नाशिकच्या पवित्र भूमीत येत्या ३१ ऑटोबरला होणारा सिंहस्थाच्या ध्वजारोहणाचा सोहळा हा केवळ एक धार्मिक विधी नाही,...