Wednesday, March 26, 2025
Homeशब्दगंधस्त्रियांनी, सावित्रीबाई फुलेंचा आदर्श घ्यावा!

स्त्रियांनी, सावित्रीबाई फुलेंचा आदर्श घ्यावा!

महात्मा जोतिराव फुले यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांची 3 जानेवारीला जयंती आहे. त्यानिमित्ताने सावित्रीबाई फुलेंनी केलेल्या सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, संसारिक, वैचारिक, साहित्यिक व मानवतावादी आशा विविध कार्याचा प्रत्येक स्त्रीने अभ्यास आणि विचारमंथन करून आपल्या आणि इतरांच्या जीवनात आमूलाग्र बदल, परिवर्तन घडवून आणण्यासाठी मनोभावे कृतिशील प्रयत्न करणे गरजेचे आहे.

प्रा. सतीश मस्के

- Advertisement -

स्वतः अनेक दुःखे पचवून, स्वतःचा जीव धोक्यात घालून समाजातील तळागाळातील माणसांना सुख मिळवून देण्याचा आणि माणसाला माणूस म्हणून प्रतिष्ठा मिळवून देण्याचा प्रयत्न महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केला आहे. दया, प्रेम, परोपकार, मानवता, आपुलकी, सदाचरण, समता ही मूल्ये त्यांनी आपल्या आयुष्यात जपली. स्त्रियांची दुखे, शुद्रांची दु:खे, अज्ञानात बुडालेल्या समाजाची दुःखे, दलितांवरील अन्याय अत्याचाराची दुःखे, विधवांची दु:खे, केशवपनाची दु:खे त्यांनी अगदी जवळून पाहिली. या सार्‍या दुःखाचा नायनाट करण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य प्राणपणाला लावले. अज्ञानाच्या अंधारातून, रूढी, परंपरा, अंधश्रद्धेच्या जोखडातून अस्पृश्य व रंजल्या गांजलेल्यांना बाहेर काढण्यासाठी, माणूसपणाचे जिने त्यांना मिळवून देण्यासाठी आपल्या पतीला म्हणजे महात्मा जोतिराव फुलेंना सावित्रीबाई फुलेंनी खांद्याला खांदा लावून साथ दिली. हरी नरके त्यांच्याविषयी म्हणतात की, महात्मा जोतिराव फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले हे देशाच्या सामाजिक आणि शैक्षणिक इतिहासातले एक आगळे-वेगळे जोडपे होते, हे खरेच आहे. त्यांनी सामाजिक समता निर्माण करण्यासाठी इथल्या व्यवस्थेशी अगदी कडाडून विरोध केला. कडवी झुंज दिली. विधवा पुनर्विवाह घडवून आणून, अस्पृश्यांच्या मुलींसाठी शाळा काढून, बालहत्या प्रतिबंधकगृह काढून, अस्पृश्यांसाठी विहीर खुली करून, दुष्काळात अन्नछत्रे उघडून, सत्यशोधक समाजाची स्थापना करून, विधवांचे पुनर्विवाह घडवून आणून एक सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्रांती घडवून आणली. स्त्रियांनी विद्या शिकू नये, सुशिक्षित होऊ नये, धर्म जाणू नये, पुरुषांच्या बरोबरीने काम करू नये अशा अनेक गैरसमजुतींना सावित्रीबाई फुले यांनी महात्मा जोतिराव फुलेंच्या मदतीने ठोकर देऊन शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात एक क्रांती घडवून आणली. पुरोहिताला नाकारून अनेक विवाह सावित्रीबाई फुले यांनी घडवून आणले. ज्या शूद्र अतिशूद्रांचे जीवन धार्मिक परंपरेने, जाती व्यवस्थेने कंगाल केले होते (महात्मा फुले यांना लग्नाच्या वरातीतून हाकलून दिले होते.) त्या धार्मिक परंपरा नाकारून विधायक विद्रोह करून समाजाला योग्य मार्गदर्शन करण्याचे काम सावित्रीबाई फुले यांनी केले. महात्मा जोतिराव फुलेंनी स्वतः सावित्रीबाई फुलेंना शिक्षण देऊन शिक्षिका केले होते. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे महत्त्वाचे माध्यम आहे, हे त्यांनी ओळखले होते. म्हणूनच सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शाळेत शिकवण्याचे काम केले. मुक्ता साळवेंसारखी धर्म चिकित्सक विद्यार्थिनी घडवली. ती व्यवस्थेला, धर्माला प्रश्न विचारू लागली. त्यांच्या या कृत्यामुळे सनातनी वर्ग खवळत असे. तरीही त्याला, त्याच्या छळाला न जुमानता सावित्रीबाई फुले यांनी आपले कार्य चालूच ठेवले. स्त्री शिकली म्हणजे ती समाजात चांगला बदल घडवून आणू शकते, असा त्यांचा विश्वास होता. सावित्रीबाई फुले ह्या उत्तम कवयित्री होत्या. ‘काव्यफुले’ नावाचा त्यांचा कवितासंग्रहही प्रसिद्ध आहे. त्या एका कवितेत म्हणतात की,

शूद्रांना सांगण्याजोगा आहे शिक्षण मार्ग हा

शिक्षणाने मनुष्यत्व पशुत्व हाटते पाहा!!

अशाप्रकारे सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाच्या माध्यमातून जातीभेद निर्मूलन करणे, अस्पृश्यांचा उद्धार करणे, सनातनी धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रातील मक्तेदारी मोडून काढणे हे कार्य केले. यासाठी त्यांनी ‘सत्यशोधक समाजा’च्या माध्यमातूनही हे कार्य केले. महात्मा जोतिराव फुले यांच्या निधनानंतर त्यांनी सत्यशोधक समाजाची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन समाजाची सेवा केली. आपल्या राहत्या घरामध्ये ब्राह्मण विधवांसाठी आश्रम सुरू केला. एका ब्राह्मण विधवेचा मुलगा (यशवंत) दत्तक घेऊन त्याला वैद्यकीय शिक्षण दिले आणि त्याचा आंतरजातीय विवाह करून दिला. सावित्रीबाई फुले या आयुष्यातील 50 वर्ष लोकांची सेवा करण्यासाठी राबत होत्या. अखेर प्लेग झालेल्या मुलाला स्वतःच्या पाठीवर घेऊन दवाखान्यात पोहोचल्या. त्या प्लेगची बाधा सावित्रीबाई फुले यांना झाली आणि 10 मार्च 1897 रोजी रात्री 9 वाजता प्लेगमुळे त्यांचे निधन झाले. एवढे सांगण्याचे कारण म्हणजे आज सावित्रीबाई फुलेंच्या कार्यामुळे स्त्रियांनी नानाविध क्षेत्रात प्रचंड क्रांती केली. प्रगती केली. पुढे गेल्या. नोकरी व विविध पदे मिळवले. परंतु सावित्रीबाई फुलेंनी जी क्रांती केली, जे काम केले, जो परिवर्तनाचा, वैज्ञानिकतेचा विचार पेरला, त्यापासून मात्र आधुनिक स्त्री कोसो दूर आहे. आज शिकलेली स्त्री ही रूढी, परंपरा, अंधश्रद्धा यामध्ये प्रचंड गुरफटून गेलेली दिसते आहे. शिक्षण घेऊनही प्रतिगामी विचारांची पेरणी आपल्या आचरणातून आणि शिक्षणातून पेरताना दिसते आहे. सावित्रीबाईंच्या अलौकिक कार्याबद्दल कृतज्ञता दाखविणे हे भारतीय स्त्रियांचे कसे कर्तव्य आहे, हे सांगताना धनंजय कीर म्हणतात की, हिंदी स्त्रिया सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यस्मृतीलाही जागत नाहीत. ज्या साध्वीने भारतातील तमोयुगात शिक्षिकेचा पेशा पत्करण्याचे अलौकिक धैर्य दाखवून हिंदी स्त्रीवर लादलेली अन्यायी बंधने झुगारून दिली; आणि मुलींना शिकवून हिंदी स्त्रियांचा उध्दार साधण्यासाठी पतीबरोबर सासर्‍याचे घर सोडले. पतीसंगे हाल अपेष्टा भोगल्या. शिव्याशाप सहन केले. त्या स्त्री शिक्षणाच्या अग्रदुतीची हिंदी स्त्रियांनी स्मृती बाळगू नये, ही कृतघ्नपणाची परमावधीच नव्हे काय? एकोणिसाव्या शतकात स्त्रियांच्या उद्धारासाठी व्यतीत केलेलं सावित्रीबाईसारखे अन्य आदर्श उदात्त उदाहरण क्वचितच आढळून येईल. म्हणून खरेतर आजच्या स्त्रीने चिकित्सक बनून, वैज्ञानिक दृष्टिकोन मनी बाळगून शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात उर्जाशील आणि प्रेरणादायी कार्य करणे फार गरजेचेच नव्हे तर काळाची गरज निर्माण झाली आहे. आजचा काळ हा पुन्हा प्रतिगामी विचाराकडे वाटचाल करताना दिसतो आहे. त्यामुळे पुन्हा स्त्री बंधनात अडकता कामा नये. फुले दाम्पत्याने स्त्रीला अनेक बंधनातून बाहेर काढले आहे. त्या स्त्रीने सामाजिक सुधारणेपासून दूर जाता कामा नये, याची जाणीव ठेवून आजच्या स्त्रीने प्रतिगामी विचारांविरुद्ध बंड उभारणे काळाची गरज आहे. जेणेकरून आजची पिढीही मानसिकदृष्ट्या सक्षम कशी बनेल यासाठीही प्रयत्न करणे काळाची गरज निर्माण झाली आहे. महात्मा जोतिराव फुलेंप्रमाणेच सावित्रीबाई फुले ह्या एक शिक्षिका, विचारवंत, समाजसुधारक, तत्त्वचिंतक, समाजचिंतक होत्या. तोच सावित्रीबाई फुलेंचा आदर्श आजच्या स्त्रियांनी आपल्या जीवनात अंगी बाळगायला हवा. एवढेच या निमित्तानं सांगावयाचे आहे.

संदर्भ:

1) हरी नरके, महात्मा फुले : शोधाच्या नव्या वाटा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि राजर्षी शाहू चरित्र साधने प्रकाशन समिती, महाराष्ट्र शासन, मुंबई, पाचवी आवृत्ती 2006

2) डॉ. मा.गो.माळी, सावित्रीबाई फुले-समग्र वाङ्मय, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, द्वितीय आवृत्ती, मार्च 1998

– मराठी विभागप्रमुख,

कर्म.आ.मा.पाटील वरिष्ठ महाविद्यालय, पिंपळनेर

मो. नं. : 9423397484

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शिक्षणाच्या बदलत्या वाटा : शैक्षणिक कामकाज, वेळापत्रक होणार काटेकोर

0
संगमनेर | Sangamner| संदीप वाकचौरे राज्य अभ्यासक्रम आराखड्या संदर्भाने राज्याच्या शैक्षणिक कामकाजाचे दिवस आणि शालेय वेळापत्रक संदर्भाने महत्त्वपूर्ण शिफारसी करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यामध्ये...