Saturday, July 27, 2024
Homeनाशिकपाण्यासाठी महिलांचे आंदोलन

पाण्यासाठी महिलांचे आंदोलन

सिन्नर । वार्ताहर Sinnar

तालुक्यातील पांगरी(Pangri) येथील खडकपुरा व मुस्लीम वाड्यातील महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर ठिय्या आंदोलन करत टँकरने शुद्ध पाणीपुरवठा करण्याची मागणी केली. यावर ग्रामपंचायत प्रशासनाने महिलांना तात्काळ पाणी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिल्यानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतले.

- Advertisement -

तालुक्यातील पूर्व भागातील पांगरी या गावात सद्यस्थितीत पिण्याच्या पाण्याची परिस्थिती गंभीर होत चालली असून गावासाठी असणार्‍या तिन्ही योजना ठप्प झाल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना खाजगी टँकरद्वारे जादा दराने पाणी विकत घ्यावे लागत आहे. शासनाकडून, मळ्यांमध्ये राहणार्‍यांसाठी टँकर पाठवून पाणीपुरवठा केला जात असला तरी हा पाणीपुरवठा अपुरा पडत आहे. टँकरद्वारे गावात दोन खेपा टाकण्यात येत आहेत. मात्र, हे पाणी अपुरे पडत असल्याने ग्रामस्थांना भटकंती करण्याची वेळ आली आहे.

गावासाठी अजून तीन खेपाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असला तरी शासनाकडे टँकर उपलब्ध नसल्याने अद्याप या खेपा वाढविण्यात आलेल्या नाहीत. मागील वर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने गावच्या सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या विहिरीने तळ गाठला आहे. तसेच मनेगावसह 16 गाव पाणीपुरवठा योजनेचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून पंचाळे येथील पेयजल योजनेचे पाणीही येणेच बंद झाल्याने नागरिकांना पिण्यासाठी पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यामुळे गावातील महिलांनी एकत्र येत ग्रामपंचायत कार्यालयावर ठिय्या देत मुबलक पाणी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली.

जवळपास 1 तास महिलांनी कार्यालयावर ठिय्या दिला. टँकरच्या खेपा वाढवून पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी सरपंच व ग्रामसेवकांनी दिल्यानंतर महिलांनी आपले आंदोलन मागे घेतले. यावेळी अरुण जाधव, गणेश पगार, मनोज जाधव, दिनकर कलकत्ते, मुन्ना कादरी, अर्जुन पगार, भरत पगार, सुभाष आहेर, रामनाथ पगार, गोरख पायगुडे, विमल पगार, लंकाबाई पगार, शबो कादरी, हालीमा कादरी, शबाना कादरी, अक्सा कादरी, हसीना मनियार, जायदा कादरी, हानीफा कादरी, अनिसा कादरी, मेहरु मनियार, शमीम कादरी, अलका अभंग, आशाबाई अभंग यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

पंचायत समितीवर हंडा मोर्चा
महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर ठिय्या दिल्यानंतर ग्रामसेवक व सरपंचांनी महिलांना तत्काळ पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले. मात्र, असे न झाल्यास सर्व महिला पंचायत समितीवर जाऊन हंडा मोर्चा काढतील असा इशारा यावेळी महिलांनी दिला.
आठ दिवसापूर्वी तीन खेपा मंजूर करण्यात आल्या असून टँकरअभावी खेपा आल्याच नाहीत. मात्र, लवकरच वाढीव तीन खेपा चालू होणार असून त्याचे नियोजन सुरु आहे. खेपा वाढल्यानंतर गावातील पाणी पुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल.
विलास सांगळे, ग्रामसेवक

- Advertisment -

ताज्या बातम्या