नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
आज (८ मार्ज) आंतरराष्ट्रीय महिला दिन. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला आहे. जागतिक महिला दिनानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात अतुलनीय काम केलेल्या प्रेरणादायी सहा महिलांचा अनोखा सन्मान करण्यात आला आहे. महिला दिनानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सोशल मीडिया अकाऊंट आजच्या दिवसासाठी सहा महिला सांभाळणार आहेत.
पंतप्रधान मोदी यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सचे काम आज दिवसभर या सहा महिला सांभाळणार आहेत. देशातील वेगवेगळ्या भागातील या महिला आहेत. या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा एक वेगळा संदेश या माध्यमातून देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले जाते.या महिला दक्षिण, उत्तर, पूर्व, पश्चिम आणि मध्य अशा विविध भागांतील आहेत. यामध्ये तामिळनाडूच्या चेन्नई येथील वैशाली रमेशबाबू, दिल्लीतील डॉ. अंजली अगरवाल, बिहारच्या नालंदाची अनिता देवी, ओडिशाच्या भुवनेश्वरमधील एलिना मिश्रा, राजस्थानमधील अजायता शाह आणि मध्य प्रदेशातील सागर येथील शिल्पी सोनी यांचा समावेश आहे. यापैकी ४ महिलांनी त्यांचे अनुभव वैयक्तिकरित्या मांडले, तर शिल्पी आणि एलिना या दोघींनी त्यांचा प्रेरणादायी प्रवास एकत्रितपणे सांगितला. या महिला क्रीडा, ग्रामीण उद्योजकता, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांसारख्या विविध क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करतात.
कोण आहे या सहा महिला?
एलिना मिश्रा आणि शिल्पी सोनी
एलिना मिश्रा आणि शिल्पी सोनी या दोन्ही महिला अत्याधुनिक संशोधन आणि तंत्रज्ञान संशोधनातील शास्त्रज्ञ आहेत. एलिना मिश्रा भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबई येथे अणुशास्त्रज्ञ आहेत.तसेच शिल्पी सोनी या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (ISRO) एक अंतराळ शास्त्रज्ञ आहेत.
वैशाली रमेशबाबू
बुद्धिबळात लहान वयातच प्रावीण्य मिळवलेल्या वैशालीने वयाच्या सहाव्या वर्षापासून सर्वोच्च स्तरावर स्पर्धा केली आहे. खेळाप्रती असलेल्या तिच्या समर्पणामुळे तिने २०२३ मध्ये बुद्धिबळातील ग्रँडमास्टर ही प्रतिष्ठित पदवी मिळवली. आपल्या धोरणात्मक बुद्धिमत्ता आणि चिकाटीने ती जागतिक स्तरावर भारताचा गौरव वाढवत आहे.
अजयता शाह
फ्रंटियर मार्केट्सच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून, अजयता ३५००० हून अधिक डिजिटलदृष्ट्या सक्षम महिला उद्योजिकांना सक्षम करून ग्रामीण उद्योजकतेत बदल घडवत आहेत. त्यांची ही योजना ग्रामीण बाजारपेठा आणि आर्थिक विकास यांच्यातील दरी कमी करून या महिलांना स्वयंपूर्ण व्यावसायिक मालक आणि आवश्यक वस्तू आणि सेवांचे शेवटच्या टप्प्यातील वितरक बनण्यास मदत करते.
अनिता देवी
गरिबी आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, “बिहारची मशरूम महिला” म्हणून प्रसिद्ध असलेल्या अनिता देवी यांनी २०१६ मध्ये माधोपूर फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनीची स्थापना करून स्वावलंबनाच्या दिशेने एक धाडसी पाऊल उचलले. मशरूम लागवडीतून त्यांनी केवळ ग्रामीण महिलांनाच नव्हे, तर शेकडो महिलांना रोजगार संधी उपलब्ध करून दिल्या, ज्यामुळे आर्थिक स्वातंत्र्य आणि आर्थिक सक्षमीकरणाचा मार्ग मोकळा झाला.
डॉ. अंजली अगरवाल
वैश्विक प्रवेशयोग्यतेच्या एक प्रमुख पुरस्कर्त्या डॉ. अगरवाल समर्थ्यम सेंटर फॉर युनिव्हर्सल ऍक्सेसिबिलिटीच्या संस्थापिका आहेत. तीन दशकांच्या कारकिर्दीत, त्यांनी सर्वसमावेशक गतिशीलता आणि अडथळा-मुक्त पायाभूत सुविधा सुनिश्चित करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले आहे. त्यांचे प्रयत्न भारतातील शाळा आणि सार्वजनिक ठिकाणे दिव्यांग लोकांसाठी अधिक सुलभ बनवण्यात मोलाचे ठरले आहेत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सहा महिलांच्या योगदानाचे कौतुक केले आहे. या संदर्भात सोशल मीडिया अकाऊंट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पोस्ट देखील केली आहे. यामध्ये पंतप्रधान मोदींनी म्हटले की, “त्यांचा दृढनिश्चय आणि यश आपल्याला महिलांच्या अमर्याद क्षमतेची आठवण करून देते. आज आणि दररोज आम्ही विकसित भारत घडवण्यात त्यांचे योगदान साजरे करतो.”
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा