चांदवड । प्रतिनिधी Chandwad
तालुक्यातील दिघवद गाव परिसरात गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून पिण्याचा पाणीपुरवठा होत नसल्याने पाणीटंचाईने संतप्त झालेल्या महिलांनी हंडे घेत मोर्चा काढत ग्रामपंचायतीस घेराव घातला. यावेळी सरपंचासह प्रशासन व सदस्यांना महिलांनी पाणीपुरवठा होत नसल्याबद्दल जाब विचारत धारेवर धरले.
दरम्यान, गाव परिसरात पाणीपुरवठा नळांव्दारे सुरळीत होण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. लवकरच पाणी पुरवठा सुरळीत होईल असे आश्वासन सरपंच रावसाहेब गांगुर्डे यांनी दिले असता एक-दोन दिवसात नळांना पाणी न आल्यास चांदवड येथे पंचायत समितीवर हंडा मोर्चा काढला जाईल, असा इशारा देत संतप्त महिलांनी आपले घेराव आंदोलन मागे घेतले.
तालुक्यातील दिघवद गाव परिसरात गत काही दिवसांपासून तीव्र पाणीटंचाईचा सामना महिला व ग्रामस्थांना करावा लागत आहे. ओझरखेड धरणावरून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या 44 गाव पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून दिघवद येथे पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र योजनेवरील तांत्रिक बिघाड व फुटलेल्या जलवाहिनीमुळे हा पाणीपुरवठा सातत्याने विस्कळीत होत आहे. लिकेज व बिघाडाच्या कारणामुळे गेल्या 15 ते 20 दिवसापासून दिघवद येथे पाणीपुरवठा होवू शकलेला नाही. मात्र पिण्यासाठी पाणी येत नसल्याने महिलांवर हंडे घेवून भटकंतीची वेळ आली आहे. परिसरातील विहिरींनी देखील तळ गाठल्यामुळे पाणीटंचाईच्या तीव्रतेत अधिक भर पडली आहे. अनेकांना विकतचे पाणी घेण्याची वेळ आली असून या संदर्भात तक्रारी करून देखील लक्ष दिले जात नसल्याने महिलांमध्ये असंतोष निर्माण झाला होता.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा
वीस दिवस उलटून देखील नळांना पाणी येत नाही व केव्हा येणार याची माहिती सुध्दा दिली जात नसल्याने संतप्त झालेल्या गावातील महिलांनी हंडे घेत मोर्चा काढत ग्रामपंचायतीस घेराव घालत सरपंच गांगुर्डे व इतर सदस्यांना देखील घेराव घातला. वीस दिवस उलटले तरी पिण्यासाठी नळांमधून पाणी येत नसल्याने होत असलेल्या हालअपेष्टांकडे संतप्त महिलांनी सरपंचासह ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष वेधले.
विहिरींनी देखील तळ गाठल्याने पिण्यासाठी पाणी आणायचे तरी कुठून असा प्रश्न संतप्त महिलांतर्फे विचारण्यात येवून सरपंचांना धारेवर धरले गेले. यावेळी सरपंच गांगुर्डे यांनी संतप्त महिलांची समजूत काढत संबंधित अधिकार्यांना गावात पाणीपुरवठा होत नसल्याने तो तातडीने सुरू करण्यात यावा या संदर्भात केलेल्या पाठपुराव्याची माहिती दिली. योजनेच्या तांत्रिक बिघाडामुळे हा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. तो लवकरच सुरळीत करण्यासंदर्भात आपला पाठपुरावा सुरू असल्याची ग्वाही सरपंच गांगुर्डे यांनी महिलांना दिली. मात्र येत्या एक-दोन दिवसात नळाव्दारे पाणी न मिळाल्यास चांदवड पंचायत समिती कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा देत महिलांनी घेराव आंदोलन मागे घेतले. यावेळी माजी सरपंच उत्तमराव झाल्टे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
या आंदोलनात सविता हिरे, अलका हिरे, कमळा हिरे, वैशाली कसबे, योगिता हिरे, मनिषा हिरे, शोभा हिरे, आशा हिरे, अनीता चव्हाण, मंगल हिरे, अंकिता हिरे, रजन कसबे, कमल हिरे आदींसह गावातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.