नंदुरबार – Nandurbar – प्रतिनिधी :
जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणार्या पंचायत समित्यामधील रिक्त झालेल्या 11 निवडणूक विभाग व 14 निर्वाचक गणातील महिला आरक्षणाच्या सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.
या निवडणूक विभाग व निर्वाचक गणात नागरिकांच्या मागास प्रवर्गातील निवडून आलेल्या उमेदवारांची निवडणूक सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार 4 मार्च 2021 पासून रद्द करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानुसार ही निवडणूक रद्द करण्यात आली होती. या सर्व जागा सर्वसाधारण व सर्वसाधारण महिला प्रवर्गातून भरणे आवश्यक असल्याने महिला आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील रिक्त 11 पैकी 5 निवडणूक विभाग आणि 14 निर्वाचक गणापैकी 8 गण महिला सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित ठेवण्यात येणार आहे. निर्वाचक गणापैकी अक्कलकुवा तालुक्यातील 1, शहादा 4 आणि नंदुरबार तालुक्यातील 3 निर्वाचक गणातील जागा महिला सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित असणार आहेत.
जिल्हा परिषद निवडणूक विभागासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात 23 मार्च 2021 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तर पंचायत समिती निर्वाचक गणासाठी तहसील कार्यालयात तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली त्याच दिवशी सकाळी 11 वाजता महिला आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. अंतिम आरक्षण सुधारणा आदेशाच्या स्वरुपात 24 मार्च 2021 रोजी शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येईल. तालुका स्तरावरील सोडतीसाठी जिल्हाधिकारी यांचेमार्फत सोडतीवर देखरेख करण्यासाठी एक उपजिल्हाधिकार्याची नेमणूक करण्यात येणार आहे.
सोडतीच्या वेळी अंतर ठेऊन बैठक व्यवस्था, मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे, सॅनिटायझरचा वापर, थर्मल स्कॅनिंग व शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात यावे, असे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी निर्देश दिले आहेत.