नाशिक । प्रतिनिधी Nashik
महामारीच्या काळात मनपाला ( NMC ) माहिती मागविण्याचा अधिकार असला तरी बेकायदेशीर पद्धतीने काम करण्याचा अधिकार नाही, तसेच इथून पुढील काम कायद्याच्या चौकटीत असावे, असे बजावत, नाशिकमधील रुग्णालयांना( Hospitals in Nashik ) उच्च न्यायालयाने ( High Court )मोठा दिलासा दिला आहे. कुठलेही ठोस कारण न देता, तीन दिवसांत कागदपत्र सादर करा अशी बेकायदेशीर नोटीस बजावल्याच्या विरोधात रुग्णालयांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
यावेळी पहिल्या सुनावणीत तीन दिवसांची मुदत वाढवून 15 दिवसांची मुदत देऊन रुग्णालयांना दिलासा दिला होता. कागदपत्र सादर केल्याने केस संपली असली तरी, मनपाच्या कारभराविषयी कोर्टाने नाराजी व्यक्त करत, इथून पुढे कुठलेही काम कायदेशीर मार्गाने असावे, असे सुनावले.
गेल्या महिन्यात मनपाने कुठलेही कारण न देता, 51 हॉस्पिटल्सला नोटीस बजावून मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात दाखल झालेल्या सर्व कोविड रुग्णांची बिले व इतर कागदपत्र 3 दिवसांत सादर करण्यास सांगितले. पालिकेला वेळोवेळी सर्व माहिती आणि बिले सादर करूनही पुन्हा याची मागणी का केली आहे, असा प्रश्न पडल्याने काही रुग्णालयांनी पत्राद्वारे विचारले असता, बेड आणि रुग्णसंख्या फेर पडताळणी साठी माहिती मागवली आहे, असे सांगत पुन्हा 3 दिवसांची मुदत देऊन अंतिम नोटीस बजावली. प्रशासनाची ही भूमिका बेकायदेशीर व अन्यायकारक असल्याने 8 रुग्णालयांना उच्च न्यायालयात सादर नोटीशीला आव्हान दिले होते.
विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन ही केस फास्ट ट्रॅक वर सुनावणीस घेत उच्च न्यायालयाने मनपाच्या कायदेशीर कारभारावर शंका व्यक्त केली आहे. म्हणून, यापुढे नियमानुसार काम करावे, अशा सूचना दिल्या. तसेच, रुग्णालयांनी कागदपत्र सादर केले असल्याने मनपाने दिलेल्या नोटीशीच्या कारवाईला पूर्णविराम मिळाला आहे. हॉस्पिटल्सच्या वतीने अॅड. तुषार सोनवणे यांनी युक्तिवाद करत आपल्या अशिलांना न्याय मिळवून दिला आहे.
अन्यायाविरोधात ठामपणे उभे राहून शहरातील 8 रुग्णालयांनी मनपाचा गलथान व अन्यायकारक कारभार चव्हाट्यावर आणला आहे. कायद्याचा आणि अधिकाराचा अतिवापर हा गैरवापर असल्यासारखाच आहे. आणि कोविड सारख्या महामारीच्या संकटात मदतीला धावून आलेल्या खासगी डॉक्टर्स आणि हॉस्पिटल्सला सहकार्य करण्याऐवजी धमक्या देणं आणि वेठीस धरणे नाशिकच्या जनतेच्या हिताचे नाही, असे सर्व डॉक्टरांनी सांगत मनपाने भविष्यात विश्वासार्हता टिकवावी अशी अपेक्षा व्यक्त करून नाशिकच्या जनतेच्या सेवेस आम्ही तत्पर आहोत असे आश्वासन दिले.