नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik
बांधकाम सुरू असलेल्या घरात फरशी बसविण्याचे काम सुरू असताना लोखंडी पाइपचा वीजवाहिनीला स्पर्श झाल्याने विजेचा जोरदार धक्का बसून कामगाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (दि. २६) चुंचाळे येथील कारगिल चौक परिसरात घडली. प्रेमकुमार चंद्रदीप पंडित (२८, रा. कामगारनगर, सातपूर) असे मृत कामगाराचे नाव आहे.
प्रेमकुमार हे त्यांचे भाऊ संजीत यांच्यासोबत कारगिल चौक परिसरातील खोली क्रमांक दोनमध्ये फरशी बसविण्याचे काम करीत होते. काम सुरू असताना लोखंडी पाइप हाताळत असताना त्याचा अचानक जवळून जाणाऱ्या वीजवाहिनीला स्पर्श झाला. त्यामुळे प्रेमकुमार यांना विजेचा जोरदार धक्का बसला आणि ते जागीच कोसळले.
घटनेनंतर त्यांचे भाऊ संजीत तसेच परिसरातील नागरिकांनी तातडीने त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर प्रेमकुमार यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस हवालदार चव्हाण पुढील तपास करीत आहेत.




