Wednesday, July 24, 2024
Homeनगरकृषी विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकर्‍यांच्या फायद्याचे - डॉ. गडाख

कृषी विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकर्‍यांच्या फायद्याचे – डॉ. गडाख

राहुरी विद्यापीठ |वार्ताहर| Rahuri

- Advertisement -

विद्यापीठाचे तंत्रज्ञान गावातील शेवटच्या शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य कृषी विज्ञान केंद्र करत आहे. खरीप हंगाम शेतकर्‍यांच्यादृष्टीने महत्त्वाचा असून कृषी विज्ञान केंद्रांची कृती कार्यशाळा योग्य वेळी होत आहे. या कृती कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यापीठाचे तंत्रज्ञान जास्तीत जास्त शेतकर्‍यांपर्यंत पोहोचले तर शेतकर्‍यांच्या उत्पन्न वाढीसाठी निश्चितच फायद्याचे ठरेल, असे प्रतिपादन संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख यांनी केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि कृषी तंत्रज्ञान अवलंबन संशोधन संस्था, विभाग-8, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील 17 कृषी विज्ञान केंद्रांची एक दिवसीय कृती कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. गडाख बोलत होते. याप्रसंगी डॉ. लाखन सिंग ऑनलाईन उपस्थित होते. यावेळी डॉ. श्रीमंत रणपिसे, डॉ. जी.के. ससाणे उपस्थित होते.

डॉ. लाखन सिंग म्हणाले, महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विविध पिकांमध्ये संशोधन करून शेतकर्‍यांसाठी मोठे योगदान दिले आहे. राहुरी कृषी विद्यापीठ हे तंत्रज्ञान तसेच तज्ज्ञांच्या बाबतीत परिपूर्ण आहे, असे ते म्हणाले.

प्रसारण केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. पंडित खर्डे यांनी प्रास्ताविक करून स्वागत केले. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी विद्यापीठातील सर्व विभाग प्रमुख, विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील एकूण 17 कृषी विज्ञान केंद्रांचे कार्यक्रम समन्वयक उपस्थित होते. या एकदिवसीय कार्यशाळेत कृषी विज्ञान केंद्रांचा मागील वर्षाचा आढावा व पुढील वर्षाचे संशोधन व विस्ताराचे नियोजन निर्धारीत होणार आहे. डॉ. भगवान देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. गोकुळ वामन यांनी आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या