Sunday, November 24, 2024
Homeक्रीडाSA vs AUS : दक्षिण आफ्रिका 'चोकर्स'चा शिक्का पुसणार? ऑस्ट्रेलियाशी आज उपांत्य...

SA vs AUS : दक्षिण आफ्रिका ‘चोकर्स’चा शिक्का पुसणार? ऑस्ट्रेलियाशी आज उपांत्य लढत

कोलकाता | Kolkata

आयसीसी वनडे क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेमध्ये आज गुरुवारी दुसऱ्या उपांत्य सामन्याच्या लढतीत दक्षिण आफ्रिका संघासमोर ऑस्ट्रेलिया संघांचे तगडे आव्हान असणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी २:०० वाजता कोलकाताच्या ईडन गार्डन क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. दक्षिण आफ्रिका संघाची ‘चोकर्स’ म्हणजेच दबावाखाली गळपटणारा संघ, अशी नकोशी ओळख निर्माण झाली आहे. ही ओळख दक्षिण आक्रिका पुसणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे…

- Advertisement -

आयसीसी वनडे क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात यजमान भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंड संघाविरुद्ध ७० धावांनी दणदणीत विजय संपादन करून अंतिम सामन्यामध्ये आपलं स्थान निश्चित केले आहे. आता दुसऱ्या स्थानासाठी दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया संघांपैकी एका संघाला भारतीय क्रिकेट संघाविरुद्ध अंतिम सामन्यामध्ये दोन हात करण्याची संधी मिळणार आहे.

दक्षिण आफ्रिका संघाचे कर्णधारपद टेंबा बवुमाकडे असणार आहे. तर पेट कमिन्स ऑस्ट्रेलिया संघांचे कर्णधारपद भूषविणार आहे. दक्षिण आफ्रिका संघांची कामगिरी यंदाच्या संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण राहिली आहे. साखळीत ९ सामन्यात ७ विजय आणि २ पराभव स्वीकारून दक्षिण आफ्रिका संघाने गुणतालिकेत दुसरं स्थान पटकावले आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध सलामीच्या दोन्ही सामन्यात पराभव स्वीकारून ऑस्ट्रेलिया संघाने स्पर्धेमध्ये सलग ७ सामन्यात विजय संपादन करून बाद फेरीत आपलं स्थान निश्चित केले आहे.

ऑस्ट्रेलिया संघाने १४ गुणांची कमाई करताना तिसरं स्थान गाठले आहे. दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध विजय संपादन करून आयसीसी वनडे क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेमध्ये आपली आठवी अंतिम फेरी गाठण्यासाठी ऑस्ट्रेलिया सज्ज असणार आहे.

दक्षिण आफ्रिका संघाला आपली पहिली अंतिम फेरी गाठण्याची संधी मिळणार आहे. अफगाणिस्तान संघाविरुद्ध २०१ धावांची खेळी साकारणारा ग्लेन मॅक्सवेल अंतिम ११ मध्ये आपलं स्थान निश्चित करण्यासाठी सज्ज असणार आहे. त्याला मार्कस सटरोईनीस बदली संधी मिळण्याची शक्यता आहे.

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघांमध्ये १०९ एकदिवसीय सामने खेळविण्यात आले आहेत. दक्षिण आफ्रिका संघाने ५५ सामन्यात विजय संपादन केला आहे. ऑस्ट्रेलिया संघाने ५० सामन्यात विजय संपादन केला आहे. आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेमध्ये लखनौच्या एकाना क्रिकेट स्टेडियम वर झालेल्या पहिल्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने विजय संपादन केला होता. या पराभवाचा वचपा काढण्यासाठी ऑस्ट्रेलिया सज्ज असणार आहे.

सामन्याच्या दिवशी हवामान खात्याने पावसाची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. दक्षिण आफ्रिका संघासाठी जमेची बाजू म्हणजे क्विंटन डी कॉक, रासी वेंडर डयु सेन,एडम मार्करम, हेन्री क्लासेन, डेव्हिड मिलर सारखे सारखे तगडे फलंदाज फॉर्मात आहेत.

गोलंदाजीमध्ये केशव महाराज, लुंगी इंगिडी, कोएटझी, कगिसो रबाडासारखे मातब्बर गोलंदाज आहेत. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघामध्ये डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, ट्रेवीस हेड,मिचेल मार्श, मारनस लबूशेन सारखे तगडे फलंदाज आहेत.गोलंदाजी बद्दल बोलायचे झाल्यास, पेट कमिन्स, मिचेल स्टार्क,जोश हेझलववूड एडम झमपा सारखे अनुभवी गोलंदाज आहेत.

दोन्ही संघांनी आपला अखेरचा सामना जिंकला आहे. ऑस्ट्रेलिया संघाने बांगलादेश संघाचा पराभव केला आहे. तर दक्षिण आफ्रिका संघाने अफगाणिस्तान संघाला पराभूत केले आहे. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियन संघ आठव्यांदा अंतिम फेरीत पोहोचणार की दक्षिण आफ्रिका ‘चोकर्स’चा शिक्का पुसून फायनलचे तिकीट मिळवणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

सलिल परांजपे, नाशिक.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या