Monday, June 24, 2024
Homeक्रीडाविश्वचषकाचे मानकरी :1983... त्या झेलने इतिहास घडविला!

विश्वचषकाचे मानकरी :1983… त्या झेलने इतिहास घडविला!

जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजापैकी एक असणारे सर विवियन रिचर्ड्स क्रिझवर होते… तुफान फटकेबाजी करीत असतानाच त्यांनी एक अप्रतिम शॉट हवेत मारला…तो शॉट बराच काळ हवेत होता… आणि त्याचवेळी क्षेत्ररक्षण करणारे कर्णधार कपिल देव यांनी त्या हवेतील चेंडूला लक्ष्य करीत नजरबंद करीत पाठीमागे पळत पळत बरेच दूरचं अंतर गाठले आणि हवेतील तो चेंडू जमिनीवर पडण्याआधीच दोन्ही हातात गच्च पकडला.. हा अप्रतिम झेल त्यावेळी भारताला विश्वविजेतेपद देऊन गेला…दिवस होता 25 जून 1983. भारताच्या पहिल्या विश्वकप विजेतेपदाची ही स्फूर्तीदायी कहाणी.

- Advertisement -

भारताच्या क्रिकेटविश्वातील सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेलेला दिवस म्हणजे 25 जून 1983. क्रिकेट जगतात काहीसा नवख्या असणार्‍या भारतीय संघाने सर्वांत बलाढ्य वेस्ट इंडिजला पराभूत करीत विश्व चषकावर पहिल्यांदा आपलं नाव कोरलं होतं. मात्र, तेथपर्यंतचा प्रवास भारतासाठी सोपा नव्हता. या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातच काय, पण सेमीफायनलपर्यंत तरी भारत पोहोचेल असंही कोणालाच वाटलं नव्हतं. पण कपिल देव यांच्या कप्तानीखाली भारतीय संघानं हे करुन दाखवलं. अंतिम सामन्यात टक्कर होती दोनदा विश्वचषक जिंकलेल्या वेस्ट इंडिज संघाशी. वेस्ट इंडिज संघाने भारतीय फलंदाजावर भेदक गोलंदाजी करीत अवघ्या 183 धावांत ऑलआऊट केले. भारताकडून सर्वांत कमी वयाचा खेळाडू असणार्‍या कृष्णमाचारी श्रीकांत यांनी सर्वाधिक 38 धावा केल्या. तर अष्टपैलू मोहिंदर अमरनाथ यांनी 26 धावांचं योगदान दिलं होतं.

भारताने ठेवलेलं 183 धावांच लक्ष्य वेस्ट इंडिजसारख्या बलाढ्य संघासाठी अत्यंत कमी होते. मात्र, भारताने अप्रतिम गोलंदाजी करीत वेस्ट इंडिजला अवघ्या 140 धावांत गुंडाळले. त्यात भारताकडून मदनलाल आणि मोहिंदर अमरनाथ यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतत्या. भारतीय गोलंदाजांनी 140 धावांत वेस्ट इंडिजला ऑलआऊट केले खरे, पण सामना बदलला तो एका कॅचने. वेस्ट इंडिजने 183 धावांच्या छोट्या लक्ष्याचा सामना करीत असताना सर गॉर्डन ग्रीनिज, डेसमंड हेंस यांच्या विकेट गमावल्या होत्या. पण व्हीव रिचर्डस फॉर्मात होता. त्याची फटकेबाजी सुरू झाली आणि भारताच्या गोटात निराशा पसरली होती. पण याच फटकेबाजीच्या नादात त्याचा एक शॉट बराचकाळ हवेत राहिला व कपिल देवने पाठीमागे पळत जात हा झेल पकडला आणि तिथूनच सामना भारताच्या पारड्यात झुकण्यास सुरुवात झाली. त्यानंतर भारताने एक एक करीत विकेट घेण्यास सुरुवात केली. अखेर वेस्ट इंडिजकडून जेफ दुजाँ आणि माल्कम मार्शल यांनी थोडी झुंज देण्याचा प्रयत्न केला खरा पण भारतीय गोलंदाजांनी त्यांचीही विकेट घेत भारताला सामना जिंकून दिला. वेस्ट इंडिजचा संघ 140 धावांतच गारद केला. भारत 43 धावांनी विजयी झाला. भारताने आपला पहिला विश्वचषक क्रिकेटची पंढरी असणार्‍या लॉर्डसवर मिळवला. ज्यानंतर तेव्हापासून आतापर्यंत लॉर्डसच्या बाल्कनीतील कपिल देव यांनी हातात चषक घेतलेला फोटो व त्यावेळचे त्यांचे ते प्रसिद्ध हास्य अनेक भारतीय क्रिकेटपटूंना प्रेरणा देत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या