Tuesday, May 7, 2024
Homeक्रीडाविश्वचषकाचे मानकरी : 1987... विश्वचषक प्रथमच कांगारुंकडे

विश्वचषकाचे मानकरी : 1987… विश्वचषक प्रथमच कांगारुंकडे

पहिले तीनही क्रिकेट विश्वचषक इंग्लंडमध्ये झाले. मात्र, 1987 साली ही स्पर्धा प्रथमच इंग्लंडबाहेर आयोजित करण्यात आली. पहिले दोन विश्वकप वेस्ट इंडिजने जिंकल्यावर तिसरा 1983चा वर्ल्डकप भारताने जिंकला व वेस्ट इंडिजला विजयाची हॅटट्रीक करता आली नाही. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये 8 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर या दरम्यान 1987ची स्पर्धा पार पडली. भारतीय उपखंडातील भारत आणि पाकिस्तान या देशांमध्ये विश्वचषक स्पर्धा प्रथमच भरविण्यात आली. स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, वेस्ट इंडीज, श्रीलंका व झिम्बाब्वे या 8 संघांनी सहभाग घेतला. गट फेरीचे सामने 4 संघांच्या 2 गटांत खेळवले गेले. पहिले दोन विश्वचषक जिंकणार्‍या वेस्ट इंडिजला या वेळी उपांत्य फेरीतही पोहोचता आले नाही. उपांत्य फेरीत भारताला नमवून माईक गॅटिंग यांच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने, तर पाकिस्तानला हरवून अ‍ॅलन बॉर्डरच्या ऑस्ट्रेलियन संघाने अंतिम फेरीत धडक मारली.

कोलकात्यातील ईडन गार्डन मैदानावर 8 नोव्हेंबरला झालेल्या अंतिम सामन्यात अ‍ॅलन बॉर्डरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर ज्योफ मार्श (31 चेंडूंत 45 धावा, 4 चौकार) आणि डेव्हिड बून (125 चेंडूत 75 धावा, 7 चौकार) यांनी ऑस्ट्रेलियाला शानदार सुरुवात करून दिली. त्यांनी 75 धावांची भागीदारी केली. माईक वेलेटाने 45 धावांचे योगदान दिले. अ‍ॅलन बॉर्डर आणि डिन जोन्स यांनीही धावसंख्या वाढविण्याचा प्रयत्न केला. ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी संयमी खेळी करत 5 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 253 पर्यंत नेली आणि ऑस्ट्रेलिया हा इंग्लंडविरुद्ध 250 पेक्षा जास्त धावा करणारा पहिला संघ बनला. 4 फलंदाज झेलबाद झाले. इंग्लंडच्या एडी हेमिंग्जने 2 बळी टिपले. इंग्लंडच्या धावाची सुरुवात निराशाजनक झाली. पहिल्याच षटकात मॅकडरमॉटने टिम रॉबिन्सनला गोल्डन डकवर पायचीत केले. कर्णधार माईक गॅटिंग (45 चेंडूत 41 धावा, 3 चौकार, 1 षटकार) याने आपली विकेट गमावल्यानंतर बिल अथे (58 धावा, 103 चेंडूत, 2 चौकार) यांनी सर्वाधिक धावा केल्या. इंग्लंड जवळपास विजयासमीप आले होते. परंतु कर्णधार माईक गॅटिंग बाद झाल्यावर सामन्याचे पारडे ऑस्ट्रेलियाकडे फिरले. अ‍ॅलन बॉर्डरच्या अधूनमधून ऑफ-स्पिन गोलंदाजीवर इंग्लंडच्या फलंदाजांनी रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केला. ऍलन लँबने (55 चेंडूत 45, 4 चौकार) एक उत्तम खेळी केली. परंतु इंग्लंडसाठी आवश्यक धावगती वाढू लागल्याने ती व्यर्थ ठरली. विजयासाठी अंतिम षटकात इंग्लंडला 17 धावा करणे आवश्यक होते. मात्र, 50 षटकांत इंग्लंडचा डाव 8 गड्यांच्या बदल्यात 246 धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला 7 धावांनी हरवत विश्वचषक पहिल्यांदाच जिंकला. ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅलन बॉर्डर आणि स्टिव्ह वॉ यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.

- Advertisement -

विश्वचषक स्पर्धेत दुसर्‍यांदा अंतिम सामन्यापर्यंत मजल मारणार्‍या इंग्लंडला विजेतेपदापासून वंचित रहावे लागले. हातातोंडाशी आलेला विजय खालच्या फळीतील फलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे हिरावला गेल्याचे दुःख इंग्लंडला झाले. या सामन्यात ऑस्ट्रिलियन फलंदाजांबरोबरच गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. डेव्हीन बूनला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.

– संदीप जाधव

(9225320946)

- Advertisment -

ताज्या बातम्या