Thursday, October 31, 2024
Homeशब्दगंधजागतिक पितृदिन विशेष : ये हृदयीचे ते हृदयी

जागतिक पितृदिन विशेष : ये हृदयीचे ते हृदयी

डॉ. वैशाली बालाजीवाले

बाबांचा मला कळलेला अर्थ…

- Advertisement -

बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारं शरीर,

बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन…

स्वत:च्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून,

मुलांसाठी झटणारं अंत:करण…

बा, अण्णा, आप्पा, दादा, भाऊ, अब्बू, पापा, डॅडी, नाना, कुठल्याही नावाने हाक मारा, या व्यक्तिरेखेची ओळख मात्र एका छत्राची, आधारस्तंभची अशीच असते. वडील म्हंटलं की, डोळ्यासमोर उभे राहणारी व्यक्तिरेखा कणखर, शिस्तप्रिय कधीकधी रागीट, त्यांचा धाक वाटेल अशी, सहसा कमी बोलणारी. ही अशी व्यक्तीरेखा एका पिढीतली होती. मात्र, पिढी जशी बदलली तसे या व्यक्तीरेखेमध्येपण बदल झाले.

काहीशी हसरी, खेळकर, घरात रमणारी आणि तरीसुद्धा काळजी घेणारी, अपेक्षा ठेवणारी अशी ही व्यक्तीरेखा बनली. हा फरक शब्दांचा नसून तो दोन पिढ्यांचा आणि त्या पिढ्यांमधील बदलांचा दिसतो. आधीच्या पिढीतले बाबा हे फक्त कणखर भूमिका निभावणारे होते का, तर नाही. ते प्रेम करणारे, काळजी करणारेही होते. त्यांनाही मुलांचा अभिमान वाटत होता, पण त्या काळातले बाबा फारसे स्वतःच्या भावना प्रगट करत नव्हते.

काळ बदलला आणि आजचा बाबा बदलला. त्याचा धाक कमी झाला आणि तो मुलांबरोबर खेळू लागला, खाऊ लागला, त्यांना थोडेफार समजून घ्यायला लागला. हे करताना मात्र त्याचा धाक, आदर कमी झाला नाही. काळाच्या ओघात ‘अहो बाबा’ ‘ए बाबा’ झाला.

काळ कुठलाही असो, पूर्वीचा काळात बाबांनी मुलांशी केलेला संवाद, ‘चिरंजीव आलात का? तुम्ही जेवलात का?,’ असा असायचा. सध्याचा बाबा, ‘हाय बडी’ ‘हाऊ अबाउट डिनर?’, असा संवाद साधताना दिसतो. या दोन्ही संवादांमध्ये त्या वडिलांची आपल्या पाल्याबाबत असलेली चिंता, काळजी आणि प्रेम व्यक्त होते.

वडिलांमध्ये जेवढी अधिकार वाणी असते तितकीच मृदुताही असते. वरून कणखर दिसणारे बाबा फणसासारखे असतात. आत मात्र गोड असतात. असे म्हणतात, वडिलांचे आणि मुलीचे सूत जास्त जमते तर आईचे आणि मुलाचे जास्त जमते. खरं सांगायचं तर या सगळ्या नात्यांमध्ये कमी-जास्त असं काहीच नसतं. पालन-पोषण करणारे ते पालक आणि ते करून घेणारे ते पाल्य एवढीच काय ती या नात्याची व्याख्या होऊ शकते. पण या व्याख्येच्या आत भावना दडलेल्या असतात आणि त्या वेगवेगळ्या पद्धतीने प्रगट होत असतात.

अनेक वेळा मुलांना वाढवण्यात वडील इतके व्यस्त होऊन जातात की, त्यांच्या स्वतःच्या अपेक्षा, स्वप्न, आकांक्षा अर्धवट राहतात आणि मग आपल्या मुला-मुलींकडून त्या पूर्ण व्हाव्यात, अशी इच्छा होते. अनेक बाबा ते त्या काळातले असो किंवा आत्ताच्या, मुलांना विचारांची वागण्याची आणि उंच भरारी घेण्याची मोकळीक देतात. त्यासाठी ते त्यांच्या पंखांना बळही देतात. मुलांना उत्तमातले उत्तम शिक्षण मिळावे, त्यांना व्यवस्थित जेवण, झोप मिळावी, यासाठी ते झटत असतात.

एखादे बाबा असेपण असतात, जे काळाच्या, समाजाच्या चौकटी बाहेर जाऊन आपल्या मुलीला वेगळ्या पद्धतीने वाढवून सक्षम बनवतात. तिला मूल्यांची, विचारांची ताकद देऊन जग अनुभवायला मोकळे सोडतात. हे फक्त बाबाच करू शकतात. अशीपण उदाहरणे आहेत की, जिथे मुलींना मुलांप्रमाणेच वाढवलेले दिसते. अर्थात या सगळ्या बाबतीत त्या मुलांनी तो सक्षमपणा पेलण्याची जबाबदारीही घ्यायला लागतेच आणि त्याची जाणीवदेखील बाबाच करून देतात.

खरंतर मुलांच्या जीवनाचा खर्‍या अर्थाने आदर्श, आयुष्याचा पहिला धडा, हे बाबांचे बोट धरून त्यांच्याच पावलावर चालून मुलं शिकत असतात. वडील आणि मुलांचे नातं एक वेगळेच विश्व असतं. मुलांवर संस्कार घडावेत म्हणून बोलणारे, रागावणारे, वेळप्रसंगी एखादा फटका मारणारे बाबा कठीण प्रसंगी मायेचा, प्रेमाचा, विश्वासाचा झरा बनतात.

वडिलांची भूमिका ही नेहमी घरातला कर्ता पुरुष, कुटुंबाचा कारभारी म्हणून बघितली जाते. ती निभावताना बर्‍याच वेळा त्यांना त्यांच्या भावभावना दाबून एखाद्या पहाडासारखे कुटुंबासाठी उभे राहून काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. नाही म्हटलं तरी मुलांना बाबांची आदरयुक्त भीती वाटत असते. त्यामुळे बर्‍याच वेळा थोडेसे अंतर राहते. सध्याच्या काळात ते कमी होताना दिसते, ही गोष्ट स्वागतार्हच आहे. मुलांचे शिक्षण, अपघात किंवा कठीण प्रसंगी बाबा व्याकूळ होतात. मुलीच्या लग्नात, कारभारी असलेले बाबा मूक अश्रू ढाळत असतात. परीक्षेला जाताना बाबांनी डोक्यावर ठेवलेला हात आणि कधी खूप काही छान झालं तर आनंदाने मारलेली मिठी यात मुलांना सारे जग जिंकल्याचा अनुभव येतो.

वडील जितके दूर वाटतात, तितकेच ते जवळचेही वाटतात. बर्‍याच मुलांसाठी बाबा त्यांचे मित्रपण असतात. मुलांच्या मनातलं न सांगता ओळखणारे हे बाबाच असतात. छोटे-मोठे कुठलेही कर्तृत्व असेल तर ते अभिमानाने सर्वांना सांगणारे, हे बाबाच असतात. कुठल्याही गावाला गेले तर न विसरता आपल्या लहानग्यासाठी एखादे खेळणे आणणारे किंवा मोठ्या वयात देखील तुला हा खाद्यपदार्थ आवडतो म्हणून तो आवर्जून घेऊन येणारे बाबाच असतात.

डोळ्यादेखत मोठी होणारी मुलं बघताना काळ कुठे सुटून गेला आणि वेळ कशी सरून गेली, हे त्यांच्या लक्षातच येत नाही. मात्र, या सरणार्‍या वेळेत त्यांनी आयुष्याचा पायाच घडवलेला असतो.

काही मुलांच्या बाबतीत बाबा खूप कणखर भूमिका घेत असतात. हा धाक दरारा इतका असतो की मुलं त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही. नको, आप्पा मारतील दादा रागवतील, या भीतीने ते त्यांच्यापासून लांबच राहतात. मात्र, त्यांच्या नजरेत आपण कुठेही कमी पडू नये, हे सतत त्यांच्या मनात असतं. त्यांचा कणखरपणा, त्यांचं रागवणं, त्यांचं बोलणं हे त्या वयात जरी खूप कडक वाटत असलं तरीसुद्धा नंतरच्या काळात ते त्या मुलांना घडवायला कसं कामी आलं हे मुलांच्या लक्षात येतेच.

काही वडील मुलांशी संवाद साधू शकतात. आनंदाने त्यांच्यात वावरू शकतात. त्यांना बाहेर घेऊन जाणं, त्यांना खेळायला नेणं, त्यांना गावाला नेणं हेसुद्धा वडील करतात. मात्र, काही वडील न बोलता, शांतपणे त्यांचे कर्तव्य पार पाडत असतात. एखादा मुलगा असही म्हणतो की दादांशी बोलताच आले नाही…. मात्र, त्यांनी त्या मुलासाठी काय केलं आहे, प्रतिकूल परिस्थितीतून त्याला कसं मोठं केलं आहे, त्याला कसे उत्तम शिक्षण दिले आणि पायावर उभे केले, हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा मात्र न बोलणारे दादा आपल्यासाठी काय करून गेले याने मन भारावून जाते.

एखादी मुलगी जेव्हा मागे वळून बघते तेव्हा तिला कळतं की, या जगात, या समाजात जेव्हा आजही मुला-मुलींमध्ये भेद होत असतो तेंव्हा त्या काळातही तिच्या वडिलांनी तिला कधीच या भेदातून वाढवले नाही. त्यामुळे आज तिला खंबीरपणे एक व्यक्ती म्हणून उभे राहायला मदत होते, ही केवळ तिच्या वडिलांनीमुळेच.

एखाद्या वडिलांनी मुलांच्या लहानपणी खूप कणखर भूमिका घेतलेली असते. अभ्यास करत नाही दंगा करतो म्हणून रागवण, ओरडलं यातून ते शिस्त लावायचा प्रयत्न केलेला असतो. अगदी मुलांनी नकोसे केले तर चार फटकेही मारलेले असतात, पण त्या काळात ते तसे वागले म्हणून आज तो मुलगा अतिशय जबाबदार व्यक्ती म्हणून त्याच्या मुलांचाच नाही तर आई-वडिलांचादेखील सांभाळ करण्याइतका सक्षम होतो. हे मात्र कालांतरानेच कळते.

एखादे बाबा स्वतः फार शिकलेले नसतात, पण छोटीसी नोकरी करून आपल्या मुलांना उत्तम शिक्षण देतात. निर्भीडपणे या जगात उभ राहा आणि तुझं काम सचोटीने करत राहा, असे संस्कार त्याला न बोलता देतात आणि खूप सारे प्रेम करतात.

एखादे दादा शेतात खूप काबाडकष्ट करून शून्यातून आपल्या मुलांसाठी एक जग निर्माण करतात. त्यांना चांगलं शिकवतात आणि स्वतःचा आदर्श आपल्या मुलांपुढे ठेवतात.

एखादे भाऊ असे असतात की ज्यांनीच स्वत:च विश्व निर्माण केलेलं असत. त्या विश्वात कटाक्षाने काही नियम घालून दिलेले असतात. हे नियम त्यांच्या कुटुंबासाठी, मुलांसाठी पुढच्या आयुष्यात मार्गदर्शक ठरतात. शिस्त असली तरीसुद्धा विचारांचे स्वातंत्र्य आणि ते विचार मांडण्याची मुभा देतात आणि मुलांना घडवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करतात.

मुलं मोठी होतात, वडील मात्र वडिलांच्या भूमिकेतच राहतात. कामात व्यस्त झालेल्या मुलांना कालांतराने कधीतरी लक्षात येते की पाहिजे तेवढा वेळ आपण आपल्या वडिलांना देऊ शकलो नाही आणि ती खंत मनात कायम राहते. ती राहू नये म्हणूनच मिळेल ती संधी मिळेल तो क्षण हा आपल्या आई-वडिलांसोबत घालवणं आणि त्याचा आनंद दोघांनी घेणे, हेच उचित ठरते. कालांतराने मात्र हे नातं वेगळा आयाम घेऊ लागतं. काळजी करणारे बाबा यांची आता मुलं काळजी करायला लागलेले असतात.

या रोलची आदलाबदली कधी होते हेच कळत नाही. मुलं मोठी होतात, त्यांच्या शिक्षणात, त्यांच्या कामात व्यस्त होतात. दादा मात्र दुरून नजर ठेवून असतात.

बाप थकलेला असतो, दमलेला असतो, त्या दमलेल्या बाबाची गोष्ट पण आपल्याला माहीत असते. एखाद्या वटवृक्षाप्रमाणे आपल्याला त्याच्या छायेखाली घेत, वडील त्यांची जबाबदारी पार पाडत असतात. वडील कणखर असतात, पण त्याचं काळीज हे मऊ, भावना संपन्न आणि प्रेमळ असते. वडिलांच्या पोटातून जरी जन्म घेतला नसेल तरी असं म्हणतात की, मुलं वडिलांच्या हृदयात जन्म घेतात आणि हे नातं कायमस्वरुपी राहते… ते या हृदयीचे त्या हृदयी…..!

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या