Wednesday, October 16, 2024
Homeब्लॉगWorld Mental Health Day 2024 : कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी...

World Mental Health Day 2024 : कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी काय करावे?

आपण प्रत्येकजण आपल्या शारीरिक आरोग्याची बरीच काळजी घेत असतो. सकाळी उठल्यावर नैसर्गिक क्रिया उरकणे, दात घासणे, आंघोळ करणे (शारीरिक स्वच्छता करणे), व्यायाम करणे, सकस आहार घेणे, आजारी पडल्यावर दवाखान्यात जाणे इ. गोष्टी आपण दैनंदिन जीवनात करत असतो. पण त्यामानाने आपण आपल्या मनाच्या आरोग्याचा कधी विचार करत नाही मात्र त्याचा विचार करण्याची गरज आज निर्माण झाली आहे.

म्हणजेच आपण आपल्या शारीरिक स्वास्थ्याचा जेवढा विचार करतो, लक्ष देतो तेवढे मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष देत नाही, पण मनाच्या स्वास्थ्याब‌द्दल प्रत्येक व्यक्तीने सजग राहणे गरजेचे आहे. कारण काही व्यक्तींना रात्री झोप लागत नाही, काहीना विनाकारण भीती वाटणे, काहींच्या लक्षात राहत नाही, काही व्यक्तींचे इतर व्यक्तीबरोबर पटत नाही, काहींच्या मनात आत्महत्येचे विचार येतात, ही सर्व लक्षणे चांगले मानसिक स्वास्थ्य नसल्याची लक्षणे आहेत.

- Advertisement -

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, मानसिक स्वास्थ्य म्हणजे व्यक्तीने स्वतःची कार्यक्षमता जाणून मानसिक ताणावर मात केली पाहिजे. त्यामुळे वैयक्तिक कार्यशीलतेमध्ये वृद्धी होते आणि सामाजिक प्रगतीसाठी व्यक्ती योगदान देऊ शकते. जगाला मानसिक आरोग्याचे महत्व समजण्यासाठी तसेच लोकांमध्ये मानसिक आरोग्यासंबंधी जनजागृती होण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाचे उपमहासचीव रिचर्ड हंटर आणि वर्ल्ड फेडरेशनने जागतिक मानसिक स्वास्थ्य दिन (१० ऑक्टोबर, १९९२) साजरा करायला सुरुवात केली. १९९४ सालापासून संयुक्त राष्ट्रसंघाचे तत्कालीन महासचिव युजीन ब्रोडीने एक थीम ठेवत हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या थीम ठेवून हा दिवस साजरा करण्यात आलेला आहे. आणि या २०२४ वर्षाची थीम आहे “It is Prioritize mental health in workplace” म्हणजेच कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्याला प्राधान्य देणे.

कामाच्या ठिकाणी असणारा ताणतणाव, कामाच्या ठिकाणी असणाऱ्या आंतरवैयक्तिक संबंधांचा तणाव, पैशाशी निगडीत समस्या, चिंता निर्माण करणारे घटक, अस्वस्थता निर्माण करणारे घटक, सहकार्याबरोबरचे संबंध, वरिष्ठ-कनिष्ट संबंध, आपल्या व्यवसायांमध्ये, नोकरीमध्ये समाधानी नसणे, या सर्व गोष्टी व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करणाऱ्या असतात. आणि म्हणूनच जागतिक मानसिक आरोग्य दिनाची थीम कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्याला प्राधान्य देणे अशी आहे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या मानसिक आरोग्याकडे जर लक्ष दिले नाही तर वेगवेगळ्या मानसिक आजारांना सामोरे जावे लागेल. उदा. चिंता विकृती, अवसाद विकृती, स्किझोफ्रेनिया इ.

कामाच्या ठिकाणी चांगले मानसिक आरोग्य ठेवण्यासाठी व्यक्तीने पुढील काही गोष्टी करणे गरजेचे आहे.

वास्तववादी अभिवृत्ती ठेवली तर कुठल्याही संकटावर मात करताना, परिस्थितीचा अर्थ लावताना, प्रेरणा पूर्ण करताना वाटेल तसा अर्थ न लावता व्यक्तीला स्वतःविषयी वास्तव ज्ञान असते तसेच आपल्या क्षमता पात्रता, स्वभाव मर्यादा इत्यादिची व्यक्तीला जाणीव असली पाहिजे, अशी व्यक्ती अपयशाचे खापर दुसऱ्याच्या माथ्यावर फोडत नाही.

व्यक्तीने नेहमी चांगलाच विचार करावा. एक चांगला विचार दहा वाईट विचारांना मागे सारतो. प्रतिकूल परिस्थितीमध्ये खचून न जाता चिकाटी ठेवली तर वाईटातून चांगले निष्पन्न होते आणि हे चांगल्या मानसिक आरोग्याचे एक लक्षण आहे

कामाच्या ठिकाणी मानसिक, सामाजिक, भावनिक, आर्थिक सुरक्षितता असेल तर कर्मचाऱ्याचे मानसिक आरोग्य चांगले राहाते.

प्रेम ही एक मानसिक व भावनिक गरज आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्याबरोबर वर्चस्व न दाखवता प्रेमाची भावना दाखवून तसेच प्रेमाने बोलून काम करून घेतले तर अधिक चांगले काम होते.

कामाच्या ठिकाणी नेहमी पोषक वातावरण असावे, कर्मचाऱ्याना प्रोत्साहन मिळेल असे वातावरण असावे. नकारात्मकता असणारे वातावरण नसावे. अशा वातावरणात कोणाचीच प्रगती होत नाही.

आपले काही चुकत असेल तेथे व्यक्तीने स्वतःच्या मनोवृत्तीमध्ये बदल घडवून आणला तर चांगले समायोजन साधता येते. काही व्यक्ती कामाच्या ठिकाणी आपली भूमिका ताठर ठेवतात आणि त्याचा त्रास इतर सहकार्याना देखील होतो व कामाच्या ठिकाणचे वातावरण बिघडते, आणि त्याचे दुष्परिणाम देखील भोगावे लागतात.

सकारात्मक मानसशास्त्राचा आधार घेऊन जे होते आहे ते चांगल्यासाठी होते आहे असा विचार प्रत्येक प्रसंगात केला तर मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल.

सतत नाविन्याचा शोध घेतला पाहिजे. नवनिर्माण, नवनिर्मिती, उपक्रमशीलता, सर्जनशीलता यामध्ये व्यक्ती सतत गुंललेली राहिली तर इतर चुकीच्या गोष्टींसाठी वेळ मिळणार नाही आणि आपण काहीतरी नवीन शिकलो याचा आनंद देखील त्या व्यक्तीला असेल, यामुळे वातावरण देखील चांगले राहील.

चांगले मानसिक आरोग्य असलेल्या व्यक्तीला केव्हा व कोणत्या बाबतीत काळजी करावी हे समजते. मृत्यू, वादळे, महापूर, दुष्काळ, भूकंप, अपघात इ. गोष्टी नैसर्गिक आहेत त्यावर आपल्याला नियंत्रण ठेवता येत नाही. त्यामुळे अशा घटना वाट्‌याला आल्यानंतर अतिकाळजी करू नये. प्रिय व्यक्तीचा मृत्यू, आर्थिक नुकसान, अपघात अशा प्रसंगी दुखः होणे स्वाभाविक आहे पण सतत दुखी, काळजी करत असले तर व्यक्तीचे मानसिक आरोग्य बिघडते. म्हणून कोणत्या गोष्टीची किती काळजी करावी हे जर आपल्याला समजले तर आपले मानसिक स्वास्थ्य चांगले राहील.

कोणी कितीही त्रास दिला तरी कोणत्याही परिस्थितीत स्वतः च्या कामाप्रती एकनिष्ठ राहून आपला आत्म विश्वास आणि स्व आदर या गोष्टी कमी नाही होऊ दिल्या पाहिजे. कितीही खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला तरी डगमगले नाही पाहिजे कारण असे प्रसंग कधीकधी कामाच्या ठिकाणी घडताना दिसून येत्तात.

आपले मानसिक आरोग्य चागले ठेवण्यासाठी ध्यानधारणा, योग, प्राणायाम, चांगल्या पुस्तकांचे वाचन, चांगले विचार असणाऱ्या व्यक्तींची सोबत, ताणतणाव विसरायला लावणारे कार्यक्रम (महाराष्ट्राची हास्यजत्रा, चला हवा येऊ द्या इ.) पहिले पाहिजे यातून ताणतणावातून मुक्त होऊन व्यक्ती आनंदी जीवन जगू शकते.

अशा प्रकारे वरील गोष्टी आपले मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करतात

डॉ. सारिका क्षिरसागर (मानसशास्त्र विभाग, के.टी.एच.एम. महावि‌द्यालय, नाशिक)

- Advertisment -

ताज्या बातम्या