Sunday, November 24, 2024
Homeअग्रलेखहवे निश्चयाचे बळ!

हवे निश्चयाचे बळ!

जागतिक तंबाखूविरोधी दिवस नुकताच साजरा झाला. ‘अन्न हवे, तंबाखू नाही’ ही या वर्षीची संकल्पना आहे. तंबाखू सेवनाने 11 प्रकारचे कर्करोग होऊ शकतात. काही तज्ज्ञांच्या मते नपुंसकता वाढू शकते. एकूणच आरोग्यावरही अनेक दुष्परिणाम होतात. तेच लोकांना समजावून सांगण्यासाठी आणि तंबाखू सेवनाला आळा घालण्यासाठी नाशिकच्या नाशिक मेडिकल असोसिएशनने या संस्थेने ‘तंबाखूला नाही म्हणा’ ही मोहीम हाती घेतली आहे. तंबाखू सेवन आरोग्याला किती हानीकारक आहे हे लोकांना समजावून सांगण्यासाठी व्याख्याने, स्लाईड शो, चर्चासत्रे, स्टिकर्स चिकटवणे, माध्यमांमधून जनजागृती असे कार्यक्रम हाती घेतले जाणार असल्याचे या संस्थेच्या अध्यक्षांनी सांगितले. राज्याचा आरोग्य विभाग आणि शालेय शिक्षण विभाग ‘तंबाखूमुक्त शाळा’ अभियान राबवते. या अभियाना अंतर्गत राज्यातील 30.73 टक्के शाळा तंबाखूमुक्त असल्याची बातमी माध्यमात प्रसिद्ध झाली आहे. सरकारकडून एक हेल्पलाइनही चालवली जाते, असे सांगितले जाते. 2014 मधील कायद्याने सिगरेटच्या पाकिटावर ‘सिगरेट ओढणे आरोग्यासाठी धोकादायक आहे,’ असा इशारा चित्रासह लिहिणे बंधनकारक आहे. सरकारे, सामाजिक संस्था त्यांच्या परीने उपाय योजत आहेत. राज्यातील तीसच टक्के शाळा तंबाखूमुक्त का व्हाव्यात? सर्वच शाळा तंबाखूमुक्त का होऊ नयेत? सरकारी अध्यादेश अंमलात आणले जातात याविषयी तपासणी यंत्रणा सरकारकडे आहे का? शाळा-महाविद्यालयाच्या 200 मीटर परिसरात तंबाखू, सिगारेट आणि गुटखा यांची विक्री केली जाऊ नये, असा अध्यादेश सरकारने काढला होता. त्याचे पुढे काय झाले? त्याची अंमलबजावणी झाली असती तर ‘तंबाखूमुक्त शाळा’ अभियान राबवावे लागले असते का? या अध्यादेशाचे सर्रास उल्लंघन सुरु असल्याचे ठिकठिकाणी आढळते. कामचुकारांवर सरकार कारवाई करते का? निदान लोकांच्या तरी असे काही ऐकिवात नाही. सरकारी मोहिमांविषयी सरकारी सेवकांमध्ये ‘आपलेपणा’ची भावना असायला हवी. ही उणीव सरकार दूर कशी करणार? जनजागृती कार्यक्रम आणि मोहिमांना सकारात्मक प्रतिसाद देणे लोकांचेदेखील कर्तव्य आहे. त्यांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळणे, कर्करोगासारखी दुर्धर व्याधी टाळणे यातच त्यांचेही हित आहे याची जाणीव लोकांना कधी होणार? तंबाखू सेवन सोडणे त्यांच्याच हातात आहे. तंबाखू न खाण्याच्या निश्चयावर ठाम राहू शकतात. कोणी खाण्याचा आग्रह केला तर ते नकार देऊ शकतात. ते शक्य होत नसेल तर अशांची संगत टाळू शकतात. व्यसनी वस्तूंची विक्री करणार्‍या दुकानांमध्ये जाणे टाळू शकतात. पालकांनी संयम पाळावा. त्यांनी तंबाखू खाल्ली तर त्यांची मुले त्यांचेच अनुकरण करतील आणि त्यांनाही व्यसन जडेल याचा विसर पडू देणे हिताचे नाही. असे काही उपाय या क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते सुचवतात. तात्पर्य ‘निश्चयाचे बळ, तुका म्हणे हेचि फळ’ या उक्तीतील मर्म लोकांनी लक्षात घ्यायला हवे. शेवटी त्यांचे आरोग्य ही त्यांचीसुध्दा जबाबदारी नाही का?

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या