Monday, June 17, 2024
Homeनगरगृहिणी ते व्यावसायिक : सौ. भारतीताई मकवाना

गृहिणी ते व्यावसायिक : सौ. भारतीताई मकवाना

अशोक गाडेकर| Ashok Gadekar

- Advertisement -

भूतकाळ विसरून वर्तमानात जगताना भविष्याचा विचार करावा लागतो. भविष्यकाळ उज्वल करायचा असेल तर त्याला कष्ट व चिकाटीची जोड द्यायला हवी. हे ज्याला जमले तो अविष्यात कधीच अपयशी होत नाही. याचे मूर्तीमंत उदाहरण श्रीरामपुरातील सौ. भारतीताई जयेेंद्र मकवाना आहेत. त्या श्रीरामपुरात आल्या तेव्हा एका मोठ्या व्यावसायिकाच्या घरात श्रीमंताची सून म्हणून. काही काळानंतर दुर्देवाने होत्याचे नव्हते झाले, मात्र भारतीताई डगमगल्या नाहीत. एक महिला असूनही कुटुंबाचा आर्थिक भार खांद्यावर घेवून त्यांनी केलेली घडपड यशस्वी ठरली. आज त्या एक आदर्श माता, आदर्श पत्नी, आदर्श सासू तसेच व्यावसायिक म्हणून यशस्वी ठरल्या आहेत.

भारती जयेंद्र मकवाना या मुळच्या झारखंडच्या. त्यांचे बालपण मध्यप्रदेश मध्ये गेले. लग्नानंतर श्रीरामपूर येथे 1982 पासून स्थायीक झाल्या व इथे येऊन मराठी मातीत मिसळल्या. जन्मभूमी नाही पण कर्मभूमी महाराष्ट्रीयन गुजराती म्हणून गाजवली.

जेव्हा लग्न होवून आल्या तेव्हा श्रीरामपूर मधील अत्यंत नामांकित व समृद्ध अशा ‘एम. गोकुळदास अ‍ॅण्ड सन्स’ या फर्मच्या सुनबाई म्हणून अतिशय मानाचे व आरामाचे जीवन व्यतीत करण्याची संधी मिळाली पण कष्ट हे लहानपणापासूनच त्यांच्या रक्तात असल्याने अगदी त्या काळातही त्या घरी बसून राहिल्या नाहीत. तर आपल्या फर्म मध्ये खाद्य बनविण्यापासून सर्व जबाबदार्‍या स्विकारुन आपल्या सासर्‍यांकडून पुत्रवधू (सून) नसून आपला पाचवा पुत्रच असल्याची ह्दयात जागा मिळवली. तेथेच त्यांनी आपले सासू व सासरे स्व. मनोरमा मोहनलाल मकवाना व मोहनलाल गोकुळदास मकवाना यांच्या कडून प्रामाणिकपणा व उत्तम दर्जा (र्टीरश्रळीूं) लोकांना देण्याचे धडे गिरवले व त्याचे आयुष्यभर पालन केले.

सन 1991 मध्ये काही कारणांनी ही फर्म बंद झाली. व मोठे आर्थिक नुकसान सोसून तेव्हापासून खरा संघर्षाचा प्रवास झाला. आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी कोणतेही काम हे कमी न लेखता केवळ कष्ट करण्याच्या तयारीने त्यांनी स्विकारले. पहिले किराणा दुकान, नंतर शिवणकाम, रखरखत्या उन्हात पापड, चिप्स बनविणे, घरगुती समोसे, इडली च्या ऑर्डर्स मग काहीकाळ पहाटे 3.00 वाजता उठून ढोकळे बनवून पोहोच करणे, चहा स्टॉल, विविध फुड फेस्टिवल मध्ये स्टॉल लावून भारतीताईंनी खंबीरपणे कुटुंबाच्या आर्थिक समिकरणाला हातभार लावला. पण नंतर मुले मोठी झाली खर्च वाढले. मात्र त्या डगमगल्या नाहीत. जिद्दीने घराच्या बाहेर पडून व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला व आपल्या छोट्या मुलीला हाताशी घेवून 1999 मध्ये एका टेबलावर दाबेलीचा व्यवसाय सुरु केला.

तेव्हा मेनरोडवर एक महिला उभी राहून व्यवसाय करणार यावर अनेकांनी आक्षेप घेतले, अनेक अडचणींना सामनाही करावा लागला पण त्या खंबीरपणे आपले पती श्री. जयेंद्र मकवाना यांच्या खांद्याला खांदा मिळवून उभ्या राहिल्या. यामध्ये संपूर्ण परिवाराचीही साथ लाभली. हळूहळू श्रीरामपूर मध्ये पहिल्यांदाच ‘दाबेली’ हा पदार्थ लोकांपर्यंत पोहोचला. त्याची चव गुजराती पदार्थापासून लोकांच्या आवडी-निवडी ला जपून एक महाराष्ट्रीयन झाली व हळूहळू लोकांच्या प्रतिसादामुळे टेबलाचे रुपांतर गाडीत झाले.

रोज ताजे मटेरियल बनवणे त्यात उच्च दर्जाचे मसाले/घटक वापरुन आणि विशेषतः आपण जे घरी खातो ते उत्तम दर्जाचेच तेल तुप वापरणे ही आजोबांची शिकवण त्यांनी आयुष्यभर पाळली. या पदार्थास श्रीरामपूरसह आजुबाजुच्या राहुरी, शिर्डी, कोल्हार आदी गावांमधील दाबेली प्रेमींनी भरभरुन प्रतिसाद दिला. गरीबातील गरीब मोठ्यातील मोठे व्यवसायिक डॉक्टर्स, वकील, लहान-मोठी प्रत्येकांच्या गाड्या येवून थांबून आवर्जुन मकवाना भाभींची दाबेली खाऊन जाऊ लागले व त्यातच त्यांना समाधान आपल्या क्वालिटी कामाची पोचपावती मिळाली असे मानले.

जुन्या दिवसांची आठवण करत त्या सांगतात की, अगदी गर्दीच्या वेळी अनेक ग्राहकांनीच काकूंना मदत म्हणून कांदे कापून देणे, पाव आणून कापून देणेही केले. असे भरभरुन प्रेम ग्राहकांकडून क्वचितच एखाद्या व्यवसायिकाला मिळाले असेल असे वाटते.

या सर्व खडतर प्रवासात त्यांनी एज्युकेशन लोनच्या मदतीने आपल्या तिनही मुलांना उच्चशिक्षित केले. मोठा मुलगा डॉ. अमित (एम.डी.पी.एच.डी.) आयुर्वेद तज्ज्ञ होवून शिवाजी रोडवर वेदामृत आयुर्वेद क्लिनीक येथे प्रॅक्टिस करत आहेत त्यांच्या सोबतीला भारतीईंची डॉक्टर सूनही प्रॅक्टीस करीत आहे. त्यांनीही मोठ्या शहराच्या आकर्षण ऐवजी आपल्या आई-बाबांचीच कर्मभूमी निवडली. दोन्ही मुली राधिका व वेदिका ह्या अभियांत्रिकी पदवीधर होवून त्यांनी स्व. बळावर नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी मिळवली आहे. या सर्व प्रवासात छल्लारे, चंदन, चोथाणी परिवार, गुजराती समाज व सर्व श्रीरामपूर वासियांचे सहकार्य व प्रेम लाभल्याचे भारतीताई आवर्जुन सांगतात.

या सर्व खडतर परिस्थितीला सामोरे जातांना त्यांनी जिजाऊचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला. आपल्या मुलांवरील संस्कारात व कर्तव्यात त्या कुठेच कमी पडल्या नाहीत. एक यशस्वी माता, पत्नी, सासू व व्यावसायिक म्हणून यशस्वी ठरल्या. त्यांच्या या धडपडीची दखल घेवून सन 2010 मध्ये श्रीरामपूर नगरपरिषदेच्या वतीने महिलादिनी त्यांचा त्यांचा सन्मानही करण्यात आला आहे. जागतिक महिला दिनानिमित्त त्यांच्या धैर्याला सलाम!

- Advertisment -

ताज्या बातम्या