Friday, November 1, 2024
Homeशब्दगंधराजकीय घराण्यांमधली ‘यादवी’

राजकीय घराण्यांमधली ‘यादवी’

समाजवादी पक्षाने भाजपमधले अनेक मोहरे आपल्याकडे वळवायला सुरुवात केल्यानंतर भाजपने मुलायमसिंह यादव यांची सून अपर्णा यादव यांना आपल्या पक्षात घेतले. गोव्यात तिकिटे देताना भाजपने एकाच घरात दोन-दोन तिकिटे दिली. असे प्रयत्न यापूर्वीही झाले आहेत. विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या पक्षांमध्ये घराणेशाही आहेच. आपल्या अल्पकालीन फायद्यासाठी विविध राजकीय पक्षांकडून ही घराणी फोडण्याचे प्रयत्न होतच असतात.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच समाजवादी पार्टीला धक्का बसला. सपाने भाजपमधले अनेक मोहरे स्वतःकडे वळवायला सुरुवात केल्यानंतर भाजपने मुलायमसिंह यादव यांची सून अपर्णा यादव यांना आपल्या पक्षात घेतले. यावेळी उत्तर प्रदेशमध्ये भाजप विरुद्ध सपा अशी थेट लढत असून अपर्णा यांनी भाजपमध्ये जाणे धक्कादायक आहे. अपर्णा या सपाचे अध्यक्ष अखिलेश यांचे सावत्र भाऊ प्रतीक यादव यांच्या पत्नी आहेत. त्या अत्यंत महत्त्वाकांक्षी असून गेल्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाकडून उभ्या होत्या.

परंतु भाजपच्या रिटा बहुगुणा जोशींकडून त्यांचा पराभव झाला. अपर्णा यांना राजकारणात फारसे स्थान नसले तरी त्यांच्या माहेरचे घराणे गोरखपूरच्या मठाशी संबंधित आहे. मुख्य म्हणजे यामुळे भाजपला यादव घराणे फोडल्याचे समाधान मिळाले आहे. मुलायमसिंह यांचे मेहुणे आणि सपाचे माजी आमदार प्रमोदकुमार गुप्ता हेही भाजपमध्ये आले आहेत.

- Advertisement -

काही वर्षांपूर्वी भाजपने मेनका गांधी यांना आपल्याकडे वळवले होते. पुढे त्यांना मंत्रीही करण्यात आले आणि वरुण गांधींना खासदार करण्यात आले. हे दोघेही अनुक्रमे सुलतानपूर आणि पिलीभित या मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करत होते. आता मात्र उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतल्या स्टार प्रचारकांच्या यादीतून त्यांचे नाव कापण्यात आले आहे. दुसरीकडे प्रचारात सातत्याने मनोहर पर्रिकर यांच्या नावाचा वापर करणार्‍या भाजपने त्यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांना पणजीतून उमेदवारी देण्यास नकार दिला. आम्ही घराणेशाही मानत नाही, केवळ कोणाचा मुलगा आहे म्हणून त्याला उमेदवारी देत नाही, असे भाजपचे गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. यासंदर्भात प्रत्यक्षात काय घडते, ते लवकरच कळेल.

कुटुंब फोडण्याचे असे प्रकार केवळ उत्तर प्रदेशापुरते मर्यादित नाहीत. गेल्या आठवड्यात पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांचे बंधू मनोहर सिंग यांना काँग्रेसने तिकीट नाकारले. आता ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असून त्यासाठी त्यांना कोणाचे बळ मिळेल ते सहज कळू शकते. पूर्वी मध्य प्रदेशमध्ये विजयाराजे शिंदे भाजपमध्ये गेल्या आणि उपाध्यक्ष बनल्या. त्यांचे चिरंजीव माधवराव शिंदे हे काहीकाळ जनसंघात होते आणि नंतर काँग्रेस सरकारमध्ये अत्यंत महत्त्वाचे मंत्री बनले. मात्र त्यांचे चिरंजीव ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अत्यंत आक्रमक भाषणे करणारे ज्योतिरादित्य आता मोदीजींची आरती करू लागले आहेत. हरियाणामध्ये माजी मुख्यमंत्री आणि इंडियन नॅशनल लोकदलचे अध्यक्ष ओमप्रकाश चौटाला यांचे नातू दुष्यंत यांनी पक्षाबाहेर पडून 2018 मध्ये ‘जननायक जनता पार्टी’ची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी भाजपशी दोस्ती करून हरियाणाचे उपमुख्यमंत्रिपद मिळवले आहे. ओमप्रकाश यांचे बंधू रणजित सिंग यांनी 2019 मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि जिंकली. ते आज हरियाणातल्या भाजप सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत.

शिरोमणी अकाली दलाचे नेते आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांचे पुतणे मनप्रीतसिंग यांनी 2010 मध्ये काकांशी तसेच चुलतभाऊ सुखबीरसिंग यांच्याशी मतभेद झाल्यामुळे पक्ष सोडला आणि ‘पीपल्स पार्टी ऑफ पंजाब’ची स्थापना केली. 2016 मध्ये मनप्रीत यांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करून टाकला.

द्रमुकचे अध्यक्ष दिवंगत करुणानिधी यांचे ज्येष्ठ पुत्र एम. के. अळगिरी यांना पक्षशिस्त मोडल्याच्या कारणावरून 2014 च्या निवडणुकांपूर्वी पक्षातून काढून टाकण्यात आले. द्रमुकचे नेते आणि करुणानिधी यांचे दुसरे पुत्र एम. के. स्टॅलिन हे आज मुख्यमंत्री असून त्यांना आव्हान देण्याची भाषा करणार्‍या अळगिरी यांना राजकारणात कोणतेही स्थान उरलेले नाही. माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी 2018 मध्ये मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यशैलीच्या निषेधार्थ पक्षत्याग केला होता. त्यानंतर त्यांनी शेतकर्‍यांच्या प्रश्नांवरून मोदी सरकारविरुद्ध आंदोलन केले, पदयात्राही काढली. ते सातत्याने भाजपच्या आर्थिक धोरणांवर घणाघात करत असतात. मात्र त्यांचे चिरंजीव जयंत सिन्हा आता आपल्या वडिलांच्या झारखंडमधल्या हजारीबाग मतदारसंघाचे भाजपच्या वतीने प्रतिनिधित्व करत आहेत.

भाजपचे दिवंगत नेते जसवंत सिंग यांचे चिरंजीव मानवेंद्र सिंग 2004 ते 2009 याकाळात राजस्थानमधल्या बारमेर-जैसलमेर मतदारसंघातून खासदार झाले होते. त्यांनी चार वर्षांपूर्वी भाजपचा त्याग करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. एकनाथ खडसे यांनी भाजपवर हल्लाबोल करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असला तरी त्यांच्या सूनबाई रक्षा खडसे भाजपमध्येच आहेत. राजकीय घराण्यात कलह असतात आणि त्याचा फायदा प्रतिस्पर्धी पक्ष घेतच असतो हे या सगळ्या उदाहरणांवरून सिद्ध होते.

भाजपमध्येही वेगवेगळ्या राज्यांमध्ये घराणेशाही कशा पद्धतीने दिसते याचे अनेक दाखलेही मिळू शकतात. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी आपले चिरंजीव पंकज यांच्या उमेदवारीसाठी 2014 मध्ये प्रचंड प्रयत्न केले होते. शोभा फडणवीस युती सरकारमध्ये मंत्री होत्या. शोभा फडणवीस या देवेंद्र फडणवीस यांच्या काकू. कथित डाळ घोटाळ्यामध्ये शोभाताईंवर आरोप झाले होते तसेच त्या कारणास्तव त्यांना मंत्रिपदाचा राजीनामाही द्यावा लागला होता. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर केवळ पंकजा मुंडे यांनाच नव्हे तर प्रीतम मुंडे यांनाही पक्षाकडून संधी देण्यात आली. एकनाथ खडसे भाजपमध्ये होते तेव्हा त्यांच्या सुनेला आणि मुलीलाही संधी देण्यात आली. एवढेच नाही तर जिल्हा बँकेमध्ये खडसे यांच्या पत्नीला संचालक पदावर नेमण्यात आले होते.

कर्नाटकमध्ये देवेगौडा आणि त्यांचे चिरंजीव कुमारस्वामी जनता दल (सेक्युलर)चे प्रमुख आहेत. भाजपने या पक्षाशीही दोस्ती केली होती. ओडिशामध्ये बिजू पटनायक यांचे चिरंजीव नवीन पटनायक यांनी आपल्या पक्षाला सत्ता मिळवून दिली आणि भाजपशी टक्कर घेऊन लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये सातत्याने यश मिळवले. घराणेशाहीला लोकांचा विरोध असता तर हे घडून आले नसते.

महत्त्वाचे म्हणजे बिजू जनता दलाशीदेखील भाजपची युती होती. पण भाजपची गरज नसल्याचे लक्षात आल्यानंतर नवीन पटनायक यांनी ही दोस्ती तोडून टाकली. थोडक्यात सांगायचे तर विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या पक्षांमध्ये घराणेशाही आहेच. आपल्या अल्पकालीन फायद्यासाठी ही घराणी फोडण्याचे प्रयत्न विविध राजकीय पक्षांकडून होत असतात. यापुढेही ते होत राहतील. परंतु संबंधित घराणे लोकांमध्ये किती रुजले आहे यावर त्याची फलनिष्पत्ती अवलंबून असेल.

हेमंत देसाई, ज्येष्ठ अभ्यासक

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या