पुणे । प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत गावात शुक्रवारी दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेत जाळपोळ आणि तोडफोडीच्या अनेक घटना घडल्या असून, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधूर आणि हवेत गोळीबाराचा वापर केला. सध्या गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
यवत गावात पुणे-सोलापूर महामार्गावर वसलेले आहे. गावातील एका मुस्लिम तरुणाने व्हॉट्सअॅप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने हा वाद उफाळला. ही पोस्ट मध्य प्रदेशातील एका घटनेशी संबंधित होती. संबंधित तरुण मूळचा नांदेडचा असून, गवंडी काम करतो, अशी माहिती आहे. यापूर्वी, तीन दिवसांपूर्वी गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या नीलकंठेश्वर मंदिरातील पुतळ्याची विटंबना झाली होती. यामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण होते.
पुतळ्याच्या विटंबनेनंतर गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांनी यवतमध्ये ‘हिंदू आक्रोश मोर्चा’ नावाची सभा घेतली. या सभेच्या दुसऱ्या दिवशी, गुरुवारी, त्या तरुणाने आक्षेपार्ह पोस्ट टाकली. यामुळे संतप्त ग्रामस्थ आणि तरुण अधिक आक्रमक झाले. यातून दोन गट आमनेसामने आले आणि धुमश्चक्रीला सुरुवात झाली. या हिंसाचारात गावातील एक घर, एक बेकरी आणि दोन वाहनांची जाळपोळ झाली. काही तरुणांना जमावाने मारहाण केल्याच्याही तक्रारी समोर आल्या आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित कारवाई केली. जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या आणि हवेत गोळीबार करण्यात आला. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पुण्याहून अतिरिक्त पोलीस कुमक मागवण्यात आली. यवतमध्ये शांतता राखण्यासाठी कलम १४४ लागू करण्यात आले आहे, जे पुढील ४८ तासांसाठी लागू राहील. या कायद्याअंतर्गत पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यवतमधील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे सांगितले. अजित पवार यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. “महाराष्ट्र हा शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा आहे. येथील परंपरा ही सर्वांना सोबत घेऊन जाणारी आणि जातीय सलोखा राखणारी आहे. यवतकरांनी ही परंपरा कायम ठेवावी,” असे त्यांनी सांगितले. त्या तरुणाचा गावाशी फारसा संबंध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यवत गावात यापूर्वी अशा घटना घडल्या नव्हत्या. गावकरी नेहमीच एकोप्याने आणि सौहार्दाने राहत आले आहेत. पोलिस आणि प्रशासन सध्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी शांतता राखावी आणि कायदा व सुव्यवस्थेला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.





