अहिल्यानगर (प्रतिनिधी)
जिल्ह्याच्या काही भागात ३ ते ६ मे दरम्यान विजांच्या कडकडाटांसह वादळी वारा व हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाच्यावतीने सूचना जारी करण्यात आली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील संपूर्ण कोकण, खान्देश, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड नांदेड, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अमरावती अशा २६ जिल्ह्यात शनिवार ३ ते १० मे पर्यंतच्या आठवड्यात ढगाळ वातावरण राहून किरकोळ ठिकाणी विजा, वारा व गडगडाटीचे वातावरण राहून पावसाची शक्यता जाणवते, अशी माहिती हवामान खात्याचे सेवानिवृत्त अधिकारी माणिकराव खुळे यांनी दिली आहे.
सध्या महाराष्ट्रात दिवसाचे कमाल तापमान ३८ डिग्री तर काहीं ठिकाणी विशेषतः छत्रपती संभाजीनगर, धाराशिव या जिल्ह्यात ४० डिग्रीच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात रात्रीचा उकाडा वा कुठेही उष्णतेच्या लाटेची शक्यता जाणवत नाही, असे खुळे यांनी कळवले आहे.
वेगाने वाहणाऱ्या आर्द्रतायुक्त बदल
अरबी समुद्रात दीड किमी उंचीपर्यंत घड्याळ काटा दिशेने फिरणाऱ्या प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळे विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात ताशी ४५ ते ५० किमी वेगाने वाहणाऱ्या आर्द्रतायुक्त उत्तरी वाऱ्यामुळे हा वातावरणीय बदल झाला असल्याचे खुळे यांनी सांगितले आहे.