नाशिक | प्रतिनिधी
पक्षविरोधी काम केल्याने ऍड.माणिकराव शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षाचे सरचिटणीस शिवाजी गर्जे यांनी याबाबतचे आदेश आज काढले आहेत.
ऍड. शिंदे यांनी ऑक्टोबर नोव्हेंबर २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत येवला विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार छगन भुजबळ यांना या मतदार संघातून निवडणून आणण्याचा पक्षाचा आदेश असतानाही त्यांनी पक्ष विरोधी काम केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.
ऍड शिंदे यांनी भुजबळ यांच्याच्याऐवजी शिवसेनेचे उमेदवार संभाजी पवार यांचा प्रचार केल्याचाही आरोप होता.
पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे ऍड. शिंदे यांच्यावर स्थानिक पदाधिकारी नाराज होते. तसेच ऍड शिंदे यांनी खोटे नाटे आरोप करून भुजबळांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न याकाळात केला.
पक्षविरोधी कारवाया केल्याचे काही वर्तमानपत्रातील कात्रणे, पक्ष निरीक्षकांचे अहवाल यातून ऍड शिंदे दोषी आढळून आले. त्यानंतर प्रदेशाध्यक्षांकडे ऍड शिंदे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी शिफारस शिस्तपालन समितीने केली होती.
त्यानंतर ऍड. शिंदे यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला. त्यांनी सादर केलेला खुलासा सत्य परिस्थितीला धरून नसल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांची आज पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असल्याचे पत्र सरचिटणीस शिवाजी गर्जे यांनी धाडले आहे.