Saturday, November 9, 2024
Homeब्रेकिंग न्यूजयोग दिन विशेष : स्वत:साठी आणि समाजासाठी योग

योग दिन विशेष : स्वत:साठी आणि समाजासाठी योग

नाशिक । प्रतिनिधी Nashik

गेल्या दहा वर्षांपासून साजरा होणारा आंतरराष्ट्रीय योगदिन यंदा ‘स्वत:साठी आणि समाजासाठी योग’ यावर आधारित आहे. योगाभ्यासामुळे मानवी जीवनात शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक पातळीवर अनेक सकारात्मक बदल घडून येण्यास मदत होत असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.

- Advertisement -

योगाभ्यास जनजागृतीसाठी जगभरात दरवर्षी 21 जून रोजी ‘जागतिक योगदिन’ साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये 21 जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योगदिन’ म्हणून साजरा व्हावा असा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत मांडला. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत समाविष्ट असलेल्या 193 देशांपैकी 175 देशांनी या प्रस्तावाला होकार दिला. नंतर यावर सविस्तर चर्चा होऊन डिसेंबर 2014 मध्ये या दिनाला संपूर्ण मान्यता प्राप्त झाली.

21 जून हा वर्षातील इतर दिवसांपेक्षा सर्वात मोठा दिवस असतो. या दिवशी उत्तरायण संपून दक्षिणायण सुरू होते. या दिवशी सूर्योदय लवकर होऊन सूर्यास्त उशिरा होतो. दिवस मोठा असल्याने या दिवसाला विशेष महत्त्व आहे.यापूर्वी योगाचे महत्त्व काही ठराविक लोकांनाच माहीत होते. योगाविषयी काही गैरसमजही होते. योगाच्या प्राचीन शास्त्रशुद्ध परंपरेतील साधनांविषयी लोकांच्या मनातील गैरसमज दूर करून जागरुकता उत्पन्न व्हावी आणि अधिकाधिक लोकांनी योगाभ्यास करून आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले करावे यासाठी जागतिक योगदिन साजरा होऊ लागला.

योगदिनामुळे समाजाच्या सर्व स्तरावर मोठ्या प्रमाणात जनजागृती झालेली दिसत आहे.सद्यस्थितीमध्ये योगसाधनेला आपल्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग बनवणे गरजेचे झाले आहे. सन 2017 मध्ये ‘आरोग्यासाठी योग’ होता. 2018 मध्ये ‘शांततेसाठी योग’, 2019 मध्ये ‘हृदयासाठी योग’, 2020 मध्ये ‘कौटुंबिक योग’ आणि 2021 मध्ये ‘कल्याणकारी योग’ झाला. यावर्षी स्वत:च्या आणि समाजाच्या आरोग्यासाठी योग होत आहे.

दररोज योगा केल्याने शरीरावर सकारात्मक परिणाम होतो. शरीर आणि मन शांत करण्यासाठी योगा खूप फायदेशीर असतो. योगा केल्याने शरीराला ऊर्जा मिळते. स्नायूंची ताकद वाढते तसेच श्वसन, ऊर्जा आणि चैतन्य सुधारते. मानसिक, भावनिक आरोग्य चांगले राहते.
डॉ. सुनील औंधकर

मानवी आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे शास्त्र म्हणजे योगा असून भारताने संपूर्ण जगाला योगशास्त्राची एकप्रकारची विनामूल्य देणगीच दिली आहे. योगा हा केवळ व्यायाम नसून एक शास्त्र आहे. आता वैज्ञानिकांनीही ही गोष्ट मान्य करायला सुरुवात केली आहे. योगा ही एक संपूर्ण जीवनशैली आहे, जे तुमचे संपूर्ण जीवन बदलण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते.
तेजस्विनी लहामगे, आंतरराष्ट्रीय योगा शिक्षिका

योगाचे फायदे

मन शांत राहते : योगा हा स्नायूंसाठी चांगला व्यायाम आहे; परंतु वैद्यकीय संशोधनाने सिद्ध केले आहे की, योगा शारीरिक आणि मानसिक दोन्ही दृष्ट्या वरदान आहे. योगामुळे तणाव दूर होतो आणि चांगली झोप लागते, भूक चांगली लागतेे.

शरीर आणि मनाचा व्यायाम : जिममध्ये गेलात तर शरीर निरोगी राहते, पण मनाचे काय? दुसरीकडे जर तुम्ही योगाची मदत घेतली तर ते तुमचे शरीर तसेच मन निरोगी करेल.

आजारांपासून मुक्ती : योगासने करूनही आजारांपासून मुक्ती मिळू शकते. योगामुळे रोगांशी लढण्याची शक्ती वाढते. योगामुळे शरीर निरोगी आणि तंदुरूस्त राहते.

वजन नियंत्रण : योगामुळे स्नायू मजबूत होतात आणि शरीर तंदुरूस्त होते. दुसरीकडे योगाद्वारे शरीरातील चरबीही कमी करता येते.

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करा : योगासनाने तुम्ही तुमच्या रक्तातील साखरेची पातळीदेखील नियंत्रित करू शकता. मधुमेहाच्या रुग्णांसाठी योगासन खूप फायदेशीर आहे. योगामुळे एलडीएल किंवा खराब कोलेस्ट्रॉलही कमी होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या