पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
एकच व्यक्ती, एकाच वेळी दोन विभागात काम करत असल्याचे दाखवून उमेद अभियान व महिला आर्थिक विकास महामंडळ असे दोन्हीकडून पगाराची रक्कम काढली आहे. पंचायत समितीच्या उमेद अभियानामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला असून आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करावी. अशी मागणी तालुक्यातील करोडी येथील योगेश नवनाथ गोल्हार यांनी जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्याकडे केली आहे.
पाथर्डीच्या उमेद अभियानातील गैरव्यवहारात आजी व माजी अधिकारी व कर्मचार्यांमधे अडकलेले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची उपमुख्यकार्यकारी अधिकारी दर्जाच्या अधिकार्यांकडून चौकशी व्हावी. तालुक्यात बचत गटातील महिलांची आर्थिक पिळवणूक केली जात असून यामधे अनेक गावात महीलांकडून विविध कामे करण्यासाठी पैसे घेतले जातात. यात काही अधिकारी व प्रभाग समन्वयक, सीआरपी यांचा देखील सहभाग आहे. कागदोपत्री महिन्यांत चार बैठका झाल्याचे दाखविले जाते. बैठका झाल्याच्या गटाच्या अध्यक्ष व सचिव यांच्या सह्या परस्पर खोट्या केल्या जातात.
ग्रामसंघाच्या पदाधिकार्यांच्या सह्या खोट्या करुन पगार काढले जातात. गटाचे व ग्रामसंघाचे शिक्के हे सीआरपीकडे असतात. गटाचे दप्तर लिहुन देण्याचे पैसे गटाकडून घेणे, बँकेचे कर्ज प्रस्ताव करण्याचे पैसे घेतले जातात. उमेद अभियानाचे नियम घाब्यावर बसवून अधिकारी व कर्मचारी गट व ग्रामसंघाच्या पदाधिकार्यांच्या अज्ञानाचा फायदा घेवून आर्थिक लुबाडणूक करत आहेत. तालुक्यातील उमेद अभियानाची मुद्देनिहाय चौकशी व्हावी. गट एकच मात्र पगार महिला विकास मंडळ व उमेद असा दोन्ही ठिकाणाहुन घेतला गेला आहे. तोही बँकेत खात्यावर जमा झालेला आहे. यामधे शासनाच्या पैशाचा अपहार झालेला आहे. असा दावा गोल्हार यांनी केला असून शासनाची फसवणुक केलेली आहे.
पंचायत समितीचे त्यावेळचे गटविकास अधिकारी व सध्याचे गटविकास अधिकारी यांच्या सहीने पगाराचे पैसे दिलेले आहेत.शासनाच्या पैशाचा अपहार करणे. बनावट कागदपत्र तयार करुन शासनाची आर्थिक फसवणुक करणे, महिलांची आर्थिक पिळवणुक करणे याबाबत गु्न्हे दाखल करावेत, अन्यथा जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा गोल्हार यांनी दिला आहे.