लखनौ | Lucknow
औरंगजेबाची स्तुती करून समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी चांगलेच वादात सापडले आहेत. महाराष्ट्र विधानसभेत अबु आझमींनी केलेल्या विधानाचा समाचार घेत त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. त्यामुळे आझमींना त्यांचे विधान चांगलेच भोवले आहे. आझमींच्या वक्तव्याचे पडसाद उत्तर प्रदेशापर्यंत उमटले आहेत. औरंगजेबाच्या मुद्यावरुन उत्तर प्रदेश विधानसभेतही राजकारण पेटले आहे. उत्तर प्रदेशमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या पाचव्या दिवशी विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आझमींवर टीका केली आहे.
काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अबू आझमी यांना चांगलेच सुनावले आहे. “कंबख्तको उत्तर प्रदेश भेज दो, इलाज हम करेंगे”, असे म्हणत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्षावरही जोरदार टीका केली. समाजवादी पक्षाचे लोक औरंगजेबला आपला हिरो मानत असल्याचा हल्लाबोल योगी आदित्यनाथ यांनी केला.
औरंगजेबाच्या पित्याने शाहजहांने त्यांच्या आत्मचरित्रात लिहून ठेवले आहे की, खुदा करे की ऐसा कमबख्त किसी को पैदा न हो, औरंगजेबाने त्याच्या पित्याला आग्र्याच्या किल्ल्यात कैद करुन ठेवले होते. तो भारताचे इस्लामीकरण करण्यासाठी आला होता. कुणीही सभ्य व्यक्ती त्यांच्या पोराचे नाव औरंगजेब ठेवत नाही असा टोलाही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लगावला. अशा औरंगजेबाजे गुणगाण करणाऱ्या कमबख्तला पक्षातूनही बरखास्त केले पाहिजे. त्यांना यूपीला पाठवा त्यांच्यावर आम्ही उपचार करु. त्यांना भारतातही राहण्याचा अधिकार दिला पाहिजे का? समाजवादी पार्टीने यावर उत्तर दिले पाहिजे, अबू आझमीला पक्षातूनही काढून टाकले पाहिजे, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणाले.
योगी आदित्यनाथ इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी समाजवादी पक्ष औरंगजेबाला हिरो समजतो. समाजवादी पक्षाचे त्यांच्या आमदारांवर नियंत्रण नाही. औरंगजेबाने भारतीयांच्या आस्थेवर प्रहार केला होता. समाजवादी पक्षाला भारतीय वारसेचा अभिमान नाही. कमीत कमी ज्यांच्या नावावर तुम्ही राजकारण करता त्यांचे तरी ऐका. डॉक्टर लोहिया म्हणाले होते, भारतीय संस्कृतीचा आधार भगवान राम, कृष्ण आणि शंकर हे आहेत. आज समाजवादी पक्ष लोहिया यांच्या विचारापासून दूर गेला आहे. आज ते औरंगजेबाला आदर्श मानतात असेही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सभागृहात म्हटले.
पुढे ते असे ही म्हणाले की, “समाजवादी पक्षाने एकीकडे महाकुंभमेळ्याला दोष दिला आणि आता देशातील मंदिरे उद्ध्वस्त करणाऱ्या औरंगजेब सारख्या व्यक्तीची प्रशंसा समाजवादी पक्षाच्या एका आमदाराकडून होते, तरीही समाजवादी पक्षाकडून त्या विधानाचा निषेध का केला जात नाही?”, अशा शब्दांत योगी आदित्यनाथ यांनी टीका केली आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा