Saturday, July 27, 2024
Homeब्लॉगतू वेडा कुंभार

तू वेडा कुंभार

घराघरांतील संवादाला किती महत्त्व आहे हे वेगळे का सांगायला हवे? एक आई ते आजी या प्रवासात बदलत जाणारे संवादाचे टप्पे धुंडाळणारे सदर…

आपल्या घरातील छोटी मुले म्हणजेच आपली गोजिरवाणी चिमणी पाखरे चिवचिवाट करू लागतात. त्यांच्या अखंड चिवचिवाटाने घर आनंदाने निनादू लागते. चिमण्या पाखरांना मायेने खाऊपिऊ घालणारी मायेची आजी घरात असली तर त्यांचे भरपूर कोडकौतुक होते. आजीसाठी नातवंडे म्हणजे लोण्याचा गोळा असतो. हे बालगोपाळही लोण्याच्या मऊशार गोळ्यासारखे हळूवार व अलवार असतात नि तितकीच खोडकर व अल्लडही. त्यांच्या कलाने आजी बरोबर त्यांना जेवण भरवते. आजच्या मुलांची आई करिअरच्या व्यापात व धावपळीत असते हे आजीला समजते. मग चिमणपाखरांना मायेची ऊब आजीकडूनच मिळते. तिच्या मऊ पदराच्या सावलीत त्यांना कोणत्याही गोष्टीची झळ लागत नाही. त्यांचे पोट भरले की आजीच्या चेहर्‍यावर तृप्तीचा आनंद दिसतो, जणूकाही आजीच्या रूपाने श्री विठ्ठलच बाळांना भरवत असतो. मी लहान मुलांना लोण्याच्या गोळ्याची उपमा दिली आहे. कुंभारही आपल्या कलेने मातीच्या गोळ्यापासून सुबक मडके, माठ, बोळके, पणत्या बनवतो.

कवी ग. दी माडगूळकर यांची एकापेक्षा एक सरस भावगीते आहेत. त्यांनी लिहिलेले ‘प्रपंच’ या सिनेमातील नि सुधीर फडके यांनी आपल्या भावमधूर आवाजात गायलेले

- Advertisement -

फिरत्या चाकावरशी देशी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार

हे गाणे आपल्याला भावते ते त्यातील अर्थामुळे. येथे विठ्ठल मोठ्या कुशलतेने कुंभाराकडून मातीच्या गोळ्याला हवा तसा आकार देऊन घेते. सर्वांना परवडतील असे पाण्याचे मडके बनवून घेतो.

घटाघटांचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे

मातीत पाणी टाकून बनवलेल्या गोळ्यापासून घडवलेल्या प्रत्येक घटाचे रूप आगळेवेगळे असते अगदी आपल्या घरातील सुकुमार बालकांसारखे. या बाळकृष्णरूपी बालकाचे भवितव्य उज्ज्वल घडवण्यासाठी आजी त्याला प्रेमाने गोंजारत चार गोष्टी शिकवत असते. ज्याप्रमाणे कुंभार आपल्या चाकावर मातीच्या गोळ्याला हळूवारपणे हाताने आकार देत जणू कुरवाळतच असतो. कुंभाराकडून मातीचा घट तयार करून घेताना विठ्ठलाला चांगलाच आनंद व समाधान प्राप्त होते कारण कुंभाराच्या रूपाने साक्षात विठ्ठलच घट बनवत असतो. वाचकहो, घरातील आजी, श्री विठ्ठलाचे रूप नव्हे का? देवाचे देवत्व व ममत्व तिच्या ठायी ओतप्रोत भरलेले असते. ही माऊलीही कोणात भेदभाव करत नाही. गुणी नातवंडांना घडवण्याचे अवघड काम ती आपल्या हळूवार मायेने व हाताने अगदी सहजपणे करते. तिने वाढवलेली चिमणी बाळं कितीही मोठी झाली तरी आपली आजी मात्र कायम त्यांच्या स्मरणात राहते. मुलाचा संसार व्यवस्थित चालतो अशा समजूतदार आईच्या सहवासाने नि सुनेलाही मिळते सासूबाईंकडून आईचे प्रेम नि सहकार्य. एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ यानुसार चालणार्‍या संसारात ठिणगी पडण्याचा प्रश्नच येत नाही. हा सुखी संसार छान हिंदोळ्यावर झुलतो एकमेकांवरील सहज प्रेमामुळे!

- Advertisment -

ताज्या बातम्या