Thursday, May 2, 2024
Homeनगरएमआयडीसीचे श्रेय तुम्ही घ्या, पण रिकामे उद्योग करू नका

एमआयडीसीचे श्रेय तुम्ही घ्या, पण रिकामे उद्योग करू नका

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

तुम्हाला एमआयडीसीचं श्रेयच हवं असेल तर मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो की ही एमआयडीसी तुमच्यामुळेच झाली. पण रिकामे उद्योग कशाला करता? तुमच्या वैयक्तिक स्वार्थापोटी लाखो युवकांना, गोर गरीब जनतेला, पुढच्या पिढ्यांना कशात अडचणीत का आणता? असा सवाल आ. रोहित पवार यांनी राजकीय विरोधकांना विचारला आहे.

- Advertisement -

गेल्या काही महिन्यांपासून कर्जत-जामखेडमधील एमआयडीचा मुद्दा चर्चेत आहे. आ.पवार यांनी एमआयडीसी मंजूरीची प्रक्रीया राबविली होती. मात्र त्यानंतर विद्यमान राज्य सरकारने ही एमआयडीसी रद्द केली. त्यानंतर स्थानिक राजकारण पेटले आहे. एमआयडीसीबाबत आपली भूमिका मांडताना आ. पवारांनी लिहिलं आहे, एखाद्या भागात उद्योग व्यवसाय आल्याने त्या भागाची होणारी भरभराट मी पाहिली आहे. त्या भागातल्या सर्वसामान्यांचे उंचावणारे जीवनमान मी पाहिले आहे. ज्याप्रमाणे योग्य नियोजन करून बारामती, रांजणगाव, छत्रपती संभाजीनगर यासारख्या अनेक भागात औद्योगिक विकास झाला, भरभराट झाली तोच विकास तीच भरभराट माझ्या भागातही व्हावी, ही माझी साधी इच्छा एक लोकप्रतिनिधी म्हणून आहे.

युवा संघर्ष यात्रेत चालत असताना सुद्धा प्रत्येक भागात त्या-त्या जिल्ह्यात त्या-त्या तालुक्यात एमआयडीसी व्हाव्यात ही युवा वर्गाची मागणी समोर आली. कर्जत-जामखेडमध्ये एमआयडीसी व्हावी यासाठी मी गेल्या तीन वर्षापासून पाठपुरावा करत आहे, लढत आहे. सर्व काही झालं आहे, सर्वेक्षण झालं आहे, सर्व परवानग्या मिळाल्या आहेत, फक्त एक सही तेवढी बाकी आहे. परंतु केवळ राजकीय श्रेयवादातून एमआयडीसी जाणून बुजून रोखली जात आहे, असा आरोप रोहित पवारांनी केला आहे.

एखाद्या बिनडोकाच्या स्वार्थासाठी…

भाजपचे विधान परिषद आ. राम शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष हल्लाबोल करत रोहित पवारांनी म्हटलं आहे की, एखाद्या बिनडोक, कुठलीही दूरदृष्टी नसलेल्या आणि राजकीय स्वार्थासाठी जनहिताचा बळी देणार्‍या व्यक्तीच्या दबावापोटी लाखो लोकांच्या भविष्याशी खेळणे सरकारला शोभते का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा, देवेंद्र फडणवीस तुम्ही तर कार्यक्षम आहात. जनतेसाठी काय योग्य आहे, काय अयोग्य हे किमान तुम्हाला तरी कळायला हवे. सरकारच्या याच धोरणामुळे राज्यातून उद्योग बाहेर जात आहेत आणि नवे उद्योग यायला तयार नाहीत. हे असंच चालू राहिलं तर उद्याची पिढी तुम्हाला माफ करणार नाही. हे असं अधोगतीकडे नेणारे राजकारण महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणारं नाही. विकासाचं राजकारण करायचं की काही बिनडोक लोकांच्या राजकीय दबावाला बळी पडून अधोगतीचं राजकारण करायचं याचा विचार राज्याच्या नेतृत्वाने करायला हवा. त्यामुळं कुठलाही आकस न ठेवता आणि कोणत्याही दबावाला भीक न घालता कर्जत-जामखेडच्या 1 हजार एकराहून मोठ्या एमआयडीसीला तातडीने मंजुरी द्यावी, अशी मागणी आ.पवार यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या