Monday, September 28, 2026
HomeनगरKopargaon : पोलिसांनी 3 किमी फिल्मी स्टाईल पाठलाग करत अपहरणाचा कट उधळवला

Kopargaon : पोलिसांनी 3 किमी फिल्मी स्टाईल पाठलाग करत अपहरणाचा कट उधळवला

एका तरुणीसह 6 जण ताब्यात

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargaon

पुण्यातून (Pune) एका 24 वर्षीय तरुणाचे अपहरण (Young Man Abduction) करून त्याला थेट उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) पळवून नेण्याचा धक्कादायक कट समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) महामार्ग पोलिसांनी उधळून लावला आहे. पोलिसांनी 3 किलोमीटरपर्यंत सिनेस्टाईल पाठलाग करत संशयित कार अडवली आणि पीडित तरुणाची सुखरूप सुटका केली. या प्रकरणात एका तरुणीसह सहा आरोपींना जेरबंद (Accused Arrested) करण्यात पोलिसांना यश आले आहे.

- Advertisement -

पुण्याच्या चिखली परिसरातून अर्शद शकील अहमद सिद्दीकी (वय 24) या तरुणाचे अपहरण झाल्याची माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांनी (Pimpri-Chinchwad Police) समृद्धी महामार्ग कंट्रोल रूमला दिली होती. संशयित आरोपी अर्टिगा कारमधून (क्रमांक युपी 90 एइ 9375) पीडित तरुणाला घेऊन सिन्नरहून (Sinner) नागपूरच्या दिशेने पळ काढत असल्याची माहिती समोर आली. ही माहिती मिळताच बाभळेश्वर विभागाच्या महामार्ग पोलिसांनी समृद्धी महामार्गावर चॅनल क्रमांक 532 ते 502 दरम्यान तात्काळ नाकाबंदी आणि गस्त सुरू केली. गस्त घालत असताना चॅनल क्रमांक 523 जवळ पोलिसांना संशयित अर्टिगा कार भरधाव वेगाने जाताना दिसली. पोलिसांनी तात्काळ या कारचा पाठलाग सुरू केला. अखेर सलग 3 किलोमीटरच्या थरारानंतर चॅनल क्रमांक 520 जवळ पोलिसांनी अत्यंत शिताफीने कारला घेराव घालून थांबवले.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी कारमधील सर्व 6 आरोपींना ताब्यात घेतले. हे सर्व आरोपी उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) रहिवासी आहेत. मोहम्मद अन्वर सिद्दीकी (वय 39), निजामुद्दीन सिद्दीकी (वय 41), फाजिल हुसेन सिद्दीकी (वय 23), मोहम्मद साहिल सिद्दीकी (वय 21) मोहम्मद सिद्दीकी, इमामुद्दीन सिद्दीकी व सायमा खातून सिद्दीकी (वय 26) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी पीडित तरुणासह सहाही आरोपींना आणि गुन्ह्यात वापरलेली कार कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात जमा केली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांचे पथक आरोपींचा ताबा घेण्यासाठी रवाना झाले असून तरुणाचे अपहरण नेमक्या कोणत्या कारणातून करण्यात आले, याचा पुढील तपास पोलीस करत आहेत. ही कामगिरी बाभळेश्वर महामार्ग पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक विक्रांत कचरे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय ठोंबरे, पोलीस नाईक महेश बोरुडे, रामचंद्र साळुंखे, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण पालवे, रोहित अरवडे आणि शिंदे यांच्या पथकाने केली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या जनरलच्या 7 जागा बिनविरोध होण्याची शक्यता

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट गडद होत असताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मात्र राजकीय वातावरण तापण्याआधीच समझोत्याचे सूर उमटू लागले आहेत. रविवारी संगमनेर...