अहिल्यानगर (प्रतिनिधी)
पाठीमागुन धक्का दिल्याचा जाब विचारणार्या युवकावर लोखंडी चॉपरने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी (25 एप्रिल) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास शेंडी (ता. अहिल्यानगर) येथील निसर्ग लॉन मध्ये घडली. आरमान बादशाहा तांबोळी (वय 23 रा. देवगाव रस्ता, कुकाणा, ता. नेवासा) असे हल्ला झालेल्या युवकाचे नाव आहे.
दरम्यान, त्यांनी शनिवारी (26 एप्रिल) एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम लक्ष्मण गायधनी, कृष्णा लक्ष्मण गायधनी व राजे साळुंखे (पूर्ण नाव माहिती नाही, सर्व रा. देवगाव रस्ता, कुकाणा, ता. नेवासा) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. संशयित आरोपींनी आरमान तांबोळी यांना पाठीमागून धक्का दिला. याबाबत आरमान यांनी त्यांना विचारले असता संशयित आरोपींनी लोखंडी चॉपरने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व शिवीगाळ करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
सदर प्रकाराबाबत आरमान यांनी दुसर्या दिवशी एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलीस अंमलदार रमेश थोरवे करत आहेत.