अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
प्रेमसंबंधातून झालेल्या लग्नानंतर पतीकडून व त्याच्या घरच्यांकडून फसवणूक, अत्याचार, पैशांची लुबाडणूक तसेच जबरदस्तीने गर्भपात घडवून आणल्याचा गंभीर आरोप तरूणीने केला आहे. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी पीडितेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी तरूणीे पाथर्डी तालुक्यातील एका गावची असून ती सध्या अहिल्यानगर शहरात राहाते. तिने आपल्या फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार तिचे व अविनाश गोरक्ष खाडे (रा. बोल्हेगाव) यांच्यात 2017 पासून ओळख वाढत गेली. सुरूवातीला फोनवरून संवाद होऊन त्यातून प्रेमसंबंध जुळले. पुढे 2023 मध्ये अविनाशने लग्नाची मागणी घातल्याने तिने होकार दिला. अविनाशने तिला वारंवार तारकपूर, अहिल्यानगर परिसरातील एका हॉटेलवर बोलावून घेतले व लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी इच्छेविरूध्द शारीरिक संबंध ठेवले. नंतर 28 सप्टेंबर 2024 रोजी देवाची आळंदी (ता. खेड, जि. पुणे) येथील मॅरेज रजिस्ट्रारकडे दोघांचे लग्न झाले. लग्नाचे प्रमाणपत्र देखील तिला मिळाले. मात्र त्यानंतर अविनाशने आपल्याकडे नोकरी नाही, घरच्यांना सांगू नकोस असे सांगत वेळ काढला.
फिर्यादीनुसार, अविनाशने वेळोवेळी पैशांची मदत मागून फिर्यादीकडून 12 तोळे सोन्याचे दागिने व दोन लाख रूपये रोख घेतले. तसेच ऑनलाईन पध्दतीने देखील अनेक वेळा पैसे घेतले. दरम्यान त्यांच्या संबंधातून ती गर्भवती झाली असता तिने अविनाश व त्याच्या घरच्यांना याबाबत सांगितले. मात्र वाघोली (पुणे) येथे अविनाशचे वडील गोरक्ष खाडे, आई संगिता खाडे, चुलते कृष्णा खाडे व त्यांची पत्नी यांनी तिच्यावर जबरदस्तीने गर्भपाताच्या गोळ्या घेण्यास भाग पाडून गर्भपात घडवून आणल्याचा गंभीर आरोप फिर्यादीने केला आहे.
तिने केलेल्या लग्नाबाबत अविनाशचे आई-वडील व नातेवाईकांनी तीव्र विरोध दर्शवून हा विवाह मान्य नसल्याचे स्पष्ट केले. उलट तिला धमक्या, शिवीगाळ करण्यात आली असल्याचे तिने फिर्यादीत म्हटले आहे. पीडितेच्या फिर्यादीवरून अविनाश गोरक्ष खाडे, गोरक्ष खाडे, संगिता खाडे (रा. बोल्हेगाव), तसेच कृष्णा खाडे व त्यांची पत्नी (रा. वाघोली, पुणे) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास उपनिरीक्षक प्रवीण पाटील करीत आहेत.




