अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहरातील बागडपट्टी परिसरात राहणार्या एका 22 वर्षीय युवतीच्या नावाने बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार करून तिच्या नातेवाईक व मित्रमैत्रिणींना अज्ञात व्यक्तीने मेसेज केल्याने तिची व तिच्या कुटुंबाची समाजात बदनामी झाल्याची घटना समोर आली आहे.
याप्रकरणी पीडित युवतीने मंगळवारी (29 एप्रिल) येथील सायबर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी व्यक्तीविरूध्द भारतीय न्याय संहिता कलम 356 (2) (अब्रुनुकसानी) व माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66 (सी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवतीने दिलेल्या फिर्यादीनुसार, एका व्यक्तीने तिच्या नावाचा वापर करून बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार केले होते. या खात्यावरील फोटो व मजकूर वापरून युवतीच्या नावाने नातेवाईक, मित्र मैत्रिणींना मेसेज करण्यात आले, ज्यामुळे तिच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचली आहे.
सदरचा प्रकार 11 जानेवारी 2025 पूर्वी घडला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पीडिताने 29 एप्रिल रोजी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम करीत आहेत.
दरम्यान, समाजमाध्यमांचा वापर करताना सावधगिरी बाळगावी, तसेच अशा प्रकारची माहिती आढळल्यास तात्काळ सायबर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.