अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
मूळ नगर तालुक्यातील एका गावात व सध्या बोल्हेगाव परिसरात राहणार्या एका युवतीला रस्त्यात दुचाकी आडवी लावून अडवले. फोटो व्हायरल करत लग्नाची मागणी केल्याची घटना रविवारी (23 फेब्रुवारी) रात्री सावेडी परिसरात घडली. दरम्यान, यामुळे घाबरलेल्या युवतीला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिने उपचारादरम्यान पोलिसांना दिलेल्या जबाबावरून तरूणाविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात मंगळवारी (25 फेब्रुवारी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकाश सुरेश वायकर (रा. बोल्हेगाव, अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे. रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी युवती दुचाकीवरून तिच्या नातेवाईकाकडे जात होती. यावेळी आकाश याने त्याची दुचाकी आडवी लावली व युवतीला अडवले. मला तुझ्याबरोबर बोलायचे आहे, जरा रोडपासून साईडला चल, असे म्हणत युवतीला हाताला धरले व ओढत नेले. माझ्याशी लग्न कर, नाही तर तुझे फोटो माझ्याकडे आहेत, ते मी व्हायरल करेल, तुझे बरे वाईट करेल, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, आकाशला फोन आल्याने तो फोनवर बोलत होता, त्याचा फायदा घेत पीडिताने त्याच्या तावडीतून सुटका करून घेतली. घडलेला प्रकार आई- वडिल व नातेवाईकांना सांगितला. तिला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून अधिक तपास पोलीस करत आहेत.