अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
लग्नाचे आमिष दाखवून एका युवतीला सावेडी उपनगरातील तपोवन रोड परिसरातील फ्लॅटवर नेऊन तिच्यावर दोन वेळा अत्याचार केला आणि याबाबत कोणाला सांगितल्यास बदनामी करण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात दोघांविरूध्द अत्याचार, अॅट्रॉसिटी व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहिल्यानगर तालुक्यातील एका गावात राहणार्या 20 वर्षीय पीडित युवतीने सोमवारी (12 ऑक्टोबर) फिर्याद दिली आहे. कौस्तुभ सागर आंबेकर (रा. आंबेकर मळा, सारसनगर) आणि तेजस गंगाधर वारूळे (रा. साईनगर, तपोवन रोड) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. ही घटना 9 ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा ते दोनच्या सुमारास घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. संशयित कौस्तुभ याने युवतीला फ्लॅट पाहण्यासाठी जायचे असल्याचे सांगितले. त्यासाठी त्याने त्याचा मित्र तेजस वारूळे याच्या दुचाकीवर बसण्यास सांगितले. त्यानंतर कौस्तुभ हा दुचाकीवरून, तर युवती आणि तेजस हे दुसर्या दुचाकीवरून तपोवन रोडवरील अपार्टमेंटमध्ये गेले.
अपार्टमेंटमधील फ्लॅटवर पोहोचल्यानंतर तेजस याने युवती आणि कौस्तुभ यांना फ्लॅटमध्ये सोडले. त्यानंतर बाहेरून दरवाजाला कुलूप लावून तो तेथून निघून गेला. त्यानंतर फ्लॅटमध्ये कौस्तुभ याने लग्नाचे आमिष दाखवून युवतीच्या इच्छेविरूध्द दोन वेळा शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, तिने आरडाओरडा केल्यास तिची बदनामी करण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.




