Friday, July 24, 2026
Homeब्रेकिंग न्यूज५९ वर्षीय भोंदू बाबाकडून तरुणीवर अत्याचार; दोन नराधमांसह सहा महिलांना अटक

५९ वर्षीय भोंदू बाबाकडून तरुणीवर अत्याचार; दोन नराधमांसह सहा महिलांना अटक

पुणे | प्रतिनिधी

- Advertisement -

आपण प्रत्यक्ष परमेश्वराचा अवतार असल्याचा बनाव रचून एका ५९ वर्षीय भोंदू बाबाने २६ वर्षीय उच्चशिक्षित तरुणीचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे. या नराधम बाबाने तरुणीवर अनेक वर्षे लैंगिक अत्याचार तर केलेच, पण तिला स्वतःचे मूत्र पिण्यास भाग पाडून आणि विजेचे शॉक देऊन तिचा अमानुष शारीरिक व मानसिक छळ केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी खराडी पोलिसांनी मुख्य आरोपी राधामोहन मिश्रा आणि त्याच्या साथीदारांना बेड्या ठोकल्या आहेत.

या प्रकरणी पोलिसांनी राधामोहन मिश्रा (वय ५९) आणि त्याचा साथीदार स्वामी कंवल नयन (वय ५७) या दोन नराधमांसह सहा महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. हा सर्व प्रकार २००१ ते २०२६ या प्रदीर्घ कालावधीत हरियाणा आणि पुणे परिसरात घडला आहे. पीडित तरुणी उच्चशिक्षित असून ती पुण्यातील
एका नामांकित खासगी कंपनीत नोकरी करते. तिचे वडील व्यवसायाने डॉक्टर असून, स्वामी कंवल नयनच्या माध्यमातून या कुटुंबाची ओळख पंचकुला येथील गुरुदेव साधना धाम ट्रस्ट; चालवणाऱ्या राधामोहन मिश्राशी झाली होती. मिश्रा हा साक्षात ईश्वराचा अवतार असून तो सहज कुणाला दर्शन देत नाही, अशी बतावणी करून भाविकांची दिशाभूल केली जात होती.

श्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या या जाळ्यात तरुणीचे कुटुंब पूर्णपणे अडकले होते . याचाच गैरफायदा घेत भोंदू बाबाने तरुणीला तिच्या पतीपासून विभक्त होण्यास भाग पाडले आणि तिची सर्व मालमत्ता स्वतःच्या नावावर करून घेतली. इतकेच नव्हे तर, पीडितेला तिच्या कुटुंबाच्या नजरेत खोटे ठरवून तिला एकाकी पाडले आणि तिच्यावर अमानुष अत्याचार केले. या जाचाला कंटाळलेल्या पीडित तरुणीने अखेर धाडस दाखवून पोलिसांकडे धाव घेतली, त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

पुण्याच्या अप्पर पोलीस आयुक्त तेजस्विनी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, वाघोली जवळील उबाळेनगर परिसरात असलेल्या मिश्रा बाबाच्या आश्रमाची झडती घेतली असता पोलिसांना धक्कादायक पुरावे सापडले आहेत . आश्रमातील एका गुप्त भुयारी खोलीतून पोलिसांनी ८ लॅपटॉप, ११ मोबाईल, १९ हार्ड डिस्क, २९ कॅसेट, २३ पेन ड्राईव्ह आणि १० जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. याशिवाय तेथे शेकडो औषधी गोळ्यांचा साठाही आढळून आला आहे. या घटनेने पुणे शहरात मोठी खळबळ उडाली असून, भोंदू बाबांच्या भूलथापांना बळी न पडण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरातून पाणी सोडले, गोदावरीला पूर

0
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात आषाढसरींचे जोरदार तांडव नृत्य सुरू असल्याने 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणात जोरदार पाण्याची आवक...