अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
सावेडी उपनगरात राहत असलेल्या एका तरुणीचा सातत्याने पाठलाग करून त्रास देणार्या तरुणाविरोधात शनिवारी (24 मे) तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे. सागर रमेश नागपुरे (रा. भिंगार, अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.
फिर्यादी शहरातील एका कापड दुकानात काम करत असून त्या आपल्या कुटुंबासह सावेडीत राहतात. 2017 साली एका ज्वेलर्समध्ये काम करत असताना सागर नागपुरे याच्याशी त्यांची ओळख झाली होती. काही काळ त्यांनी संवाद साधला, मात्र सागरचे वर्तन सतत त्रासदायक असल्याने फिर्यादीने त्याच्याशी संपर्क तोडला. त्यानंतरही सागरने वेळोवेळी त्यांचा पाठलाग करून, मारहाण, शिवीगाळ आणि धमक्या दिल्याच्या तीन अदखलपात्र तक्रारी तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये नोंदवण्यात आल्या आहेत. तरीही सागर नागपुरे याचे त्रास देणे थांबलेले नाही.
21 मे रोजी, सकाळी 11.30 च्या सुमारास फिर्यादी कामावर जात असताना सागरने त्यांचा पाठलाग करत पत्रकार चौक येथे गाडी आडवी लावून शिवीगाळ, दमदाटी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. 22 मे सकाळी 11 वाजता घराबाहेर येऊन लग्नासाठी जबरदस्ती करत त्यांचा हात पकडून लज्जास्पद वर्तन केले आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनांनंतर शनिवार, 24 मे रोजी, पुन्हा एकदा सकाळी 11.25 च्या सुमारास आप्पुहत्ती चौक, लालटाकी रस्ता येथे गाडी आडवी लावून फिर्यादीचा हात धरून जवळ ओढण्याचा प्रयत्न केला. यावेळी पीडिताने तात्काळ 112 क्रमांकावर फोन केला असता सागर घटनास्थळावरून पसार झाला. या सार्या घटनांमुळे फिर्यादी यांनी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेत सागर नागपुरे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. पोलीस अधिक तपास करीत आहेत.