अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
अंगावर पाणी उडाले म्हणून तरुणाला रॉड, तलवार, लाकडी दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी करणार्या चौघांना तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे. चौघांनी आरिफ फकीर महंमद शेख (वय 30 रा. दगडी चाळ, मुकुंदनगर) याला मारहाण करून जखमी केले होते. 27 मे रोजी रामवाडी परिसरात ही घटना घडली होती. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
प्रकाश उर्फ निकीता रमेश जगधने (वय 24), अमोल ज्ञानेश्वर जगधने (वय 26), राहुल रमेश जगधने (वय 19), ज्योती रमेश जगधने (वय 25, सर्व रा. विजय किराणा स्टोअरजवळ, रामवाडी) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. त्यांच्यावर गंभीर दुखापत, आर्म अॅक्ट आदी कलमान्वये गुन्हा दाखल आहे.
आरिफ शेख याचा मित्र मोहसिन शेख याला कल्याण येथे जायचे असल्याने ते दोघे दुचाकीवरून मुकुंदनगर, कोठला, रामवाडी मार्गे तारकपूर बस स्थानकाकडे जात असताना रामवाडी झोपडपट्टी भागात कपाट कारखान्यासमोर रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून दुचाकी गेल्याने अंगावर पाणी उडाले, म्हणून चौघांनी आरिफ शेख याला लोखंडी रॉड, लाकडी दांडके, तलवारीने मारहाण करून गंभीर जखमी केले होते. गुन्हा दाखल झाल्यापासून मारहाण करणारे पसार होते. पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक समाधान सोळुंके यांच्या पथकाने चौघांना अटक केली आहे.