अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहरात नालेगाव परिसरातील जनकल्याण रक्तपेढीजवळ एका युवकावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. करण दीपक लांडे (वय 21, रा. ठाणगे मळा, नालेगाव) असे जखमी युवकाचे नाव आहे. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या जबाबावरून तिघांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुन्या वादातून आणि भावाला केलेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी हा हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. शिवाजी बाबुराव अनभुले (रा. कुंभार गल्ली, नालेगाव) संभाजी बाबुराव अनभुले (रा. जनकल्याण रक्तपेढी, नालेगाव) आणि राहुल बाळासाहेब वाकळे (रा. नेप्ती नाका) या तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवारी (21 एप्रिल) रात्री 12:05 वाजताच्या सुमारास फिर्यादीच्या भावाला जनकल्याण रक्त पेढीसमोर मारहाण होत असल्याचे समजल्यावर फिर्यादी घटनास्थळी गेले. तेथे संभाजी अनभुले याने फिर्यादीवर कोयत्याने वार करून त्यांना जखमी केले. जखमी फिर्यादी मित्रांसोबत दुचाकीवरून रूग्णालयात जात असताना शिवाजी व राहुल यांनी फिर्यादीला गाठून काही समजण्याच्या आतच त्यांच्यावर वार केले. हे भावाला मारल्याचा बदला आहे असे ओरडत संशयित आरोपींनी लाकडी दांडक्यानेही मारहाण केली. हल्ल्यानंतर जखमी फिर्यादीने आरडाओरडा केल्यामुळे आजूबाजूचे नागरिक जमा झाले, त्यानंतर संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला. जखमीवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.




