अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
पत्नीला फोन करून भेटल्याच्या रागातून एका फायनान्स कंपनीतील कर्मचार्यावर फायटर व धातूच्या स्टीकने मारहाण करून जखमी केल्याची घटना सावेडी नाका परिसरात रविवारी (20 सप्टेंबर) सायंकाळी घडली. या प्रकरणी तुषार अनिल वाघ आणि आदित्य कैलास निक्रड (दोघे रा. मांडवे, ता. अहिल्यानगर) यांच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी संबंधितांच्या ताब्यातील कार जप्त केली. कारची झडती घेतल्यानंतर त्यामध्ये तलवार, सुरा, धातूची स्टीक, फायटर, लाकडी दांडा आदी शस्त्रे आढळून आली. पोलिसांनी कार, सर्व हत्यार्यांसह एकूण 10 लाख 3 हजार 500 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. 38 वर्षीय फिर्यादी ब्रह्मनगर, आलमगीर, भिंगार येथे राहतात. त्यांच्या ओळखीचे तुषार वाघ आणि आदित्य निक्रड हे पूर्वी त्यांच्यासोबत काम करत होते.
फिर्यादीनुसार, शनिवारी (19 सप्टेंबर) सायंकाळी साडेसातच्या सुमारास फिर्यादी यांनी फायनान्सच्या कामासंदर्भात तुषार वाघच्या पत्नीला फोन केला होता. त्यांनी फोन न उचलल्याने त्यांना भेटण्यासाठी जात असताना त्या दरेवाडी परिसरात भेटल्या. त्यानंतर फिर्यादी घरी निघून गेले. दुसर्या दिवशी, रविवारी (20 सप्टेंबर) तुषार वाघ याने फिर्यादीला फोन करून ते कुठे आहेत, अशी विचारणा केली. त्यावेळी फिर्यादीने आपण सावेडी नाका येथे असल्याचे सांगितले. त्यानंतर सायंकाळी साडेचारच्या सुमारास तुषार वाघ हा त्याचा मित्र आदित्य निक्रड याच्यासोबत थार कारमधून सावेडी नाका येथे आला. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, तुषार वाघ याने तू माझ्या पत्नीचा पाठलाग का करतोस, तिला का भेटलास आणि तिला फोन का करतोस? अशी विचारणा करत फायटरने फिर्यादीला मारहाण केली. तलवारीने जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.




