नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सलग दुसऱ्या दिवशी शस्त्रधारी तरुणांनी दहशत माजवत खुटवड नगर परिसरात एकावर तलवारीने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली.
खुटवड नगर परिसरामध्ये श्रीपाद अपार्टमेंटच्या गेटला एका चार चाकी गाडीने (MH 15 JW 4824) जोरदार धडक दिली. यावेळी येथील रहिवाशांनी गाडी काढायला व दोघा जखमींना मदत केली. यावेळी गाडी चालकाने त्या ठिकाणाहून गाडी काढून पोबारा केला.
याच दरम्यान सदर गाडीमध्ये 15 ते 20 जण नशा करून बसले असल्याचे येथील नागरिकांच्या लक्षात आले त्या वेळी सावध पवित्रा घेतला व काही सुज्ञ नागरिकांनी ११२ या क्रमांकावर फोन करून पोलीस मदत मागवली. पोलिसांनी येत जखमी दोघांना ताब्यात घेऊन इलाजासाठी घेऊन गेले. दरम्यानच्या काळात गाडीमध्ये असलेले सर्व टोळके हातात तलवार दांडे व कोयते घेऊन पुन्हा सदरहू बिल्डिंग कडे आले. यावेळी टोळक्याने किशोर मटाले यांच्यावर धारदार तलवारीने वार केले. मटाले हे जखमी झाल्याचे बघून टोळक्याने घटनास्थळावरून पलायन केले.
याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांनी घटनास्थळी व अंबड पोलीस ठाण्याला भेट देत संशयतांवर कारवाईचे आदेश दिले. यावेळी रात्री उशिरापर्यंत संशयकांची धरपकड सुरू होती.
सदर घटनेची माहिती नगरसेवक सुवर्णा मटाले, साधना मटाले, हर्षदा गायकर, माजी नगरसेवक तानाजी जायभावे यांना समजताच त्यांनी अंबड पोलीस ठाणे गाठून संशयितांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांना निवेदन दिले.
दरम्यान,पोलिसांनी अपघात ग्रस्त गाडी जमा केली आहे.




