अहिल्यानगर/पारनेर |प्रतिनिधी| Ahilyanagar | Parner
चोरीच्या संशयावरून स्थानिक नागरिकांनी मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिलेल्या एका तरूणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सुपा पोलीस ठाणे हद्दीत बुधवारी (23 जुलै) पहाटे घडली. संबंधित तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याची कोणतीही वैद्यकीय तपासणी न करता पोलीस ठाण्यातच बसवून ठेवले होते. काही वेळात तब्येत बिघडल्याने त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ही घटना ‘कस्टोडिअल डेथ’ म्हणून नोंदवण्यात आली असून पुढील तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) वर्ग करण्यात येणार आहे.
मृत तरूणाचे नाव राठोड (पूर्ण नाव व पत्ता अद्याप अज्ञात) असे आहे. तो आपल्या साथीदारासह एका वाहनातून बुधवारी पहाटेच्या सुमारास सुपा परिसरात आल्याचे सांगितले जात आहे. पहाटे दोनच्या दरम्यान टोलनाका परिसरात संशयास्पद हालचाली दिसल्याने स्थानिकांनी त्यांना थांबवून चौकशी केली. त्यावेळी त्याचे इतर साथीदार पळून गेले, मात्र राठोड हा नागरिकांच्या तावडीत सापडला. त्यानंतर जमावाने त्याला बेदम मारहाण केली. ही घटना परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. घटनेची माहिती मिळताच सुपा पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी राठोडला ताब्यात घेतले, मात्र त्याला ताब्यात घेण्यापूर्वी कोणतीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली नाही. त्याऐवजी त्याला थेट पोलीस ठाण्यात आणून बसवण्यात आले. काही वेळातच त्याच्या तब्येतीत बिघाड होऊ लागला. अखेर त्याला उपचारासाठी रूग्णालयात हलवण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला मृत घोषित केले.
या प्रकरणात प्राथमिक तपासात पोलिसांचा गंभीर हलगर्जीपणा स्पष्ट होत आहे. संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करणे अनिवार्य असते. मात्र, पोलिसांनी हे नियम पाळले नाहीत. यामुळे पोलीस ठाण्यातच झालेल्या मृत्यूची जबाबदारी आता पोलिसांवर येते आहे. तरूणाला ताब्यात घेतल्याची पूर्ण कल्पना सुपा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांना होती. ते स्वत: त्यावेळी उपस्थित असल्याचे समजते. दरम्यान, तरूणाची ओळख पटवण्याचे व त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचे काम सुरू आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रूग्णालयात करण्यात येणार आहे.
संबंधित तरूणाच्या मृत्यू प्रकरणी ‘कस्टोडिअल डेथ’ म्हणून आकस्मात नोंद करण्यात आली आहे. अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र, या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) केस वर्ग करण्यात येणार आहे.
– सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर




