पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
तालुक्यातील शिरापूर येथे शनिवारी सायंकाळी अतुल रावसाहेब शेलार (वय 31, रा. शिरापूर) हा तरुण नदीला आलेल्या पूराच्या पाण्यात वाहून गेला. मिळालेल्या माहितीनुसार, तिसगाव-शिरापूर-घाटशिरस या रस्त्यावर असलेल्या पुलावरून नदीला पाणी वाहत होते. दरम्यान, अतुल शेलार हा पुल ओलांडत असताना अचानक तोल जाऊन वाहत्या पाण्याच्या प्रवाहात सापडला आणि काही क्षणातच पाण्यासोबत वाहून गेला.
घटनेची माहिती मिळताच तहसीलदार उद्धव नाईक, पोलीस निरीक्षक विलास पुजारी व पाथर्डी नगरपरिषद अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. शनिवारी आणि रविवारी अहिल्यानगर अग्निशमन दल व महसूल विभागाने शोधमोहीम राबवली, मात्र प्रयत्न निष्फळ ठरले. अतुल याचे वडील ग्रामपंचायत कर्मचारी आहेत. दरम्यान, 15 सप्टेंबर रोजी गणपत हरीभाऊ बर्डे (वय 65, रा. टाकळी मानूर) हे घाटशीळ पारगाव तलावातून वाहून गेले होते. आठ दिवस उलटून गेले तरी त्यांचा मृतदेहही अद्याप सापडलेला नाही.




